Maval : झोपडपट्टी पुनर्वसनासह आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा बारणे यांचा संकल्प

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या 'संकल्पनामा'चे पालकमंत्री बापट यांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्यूज- झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून झोपडपपट्टी धारकांना 500 स्क्वेअर फुटाचे हक्काचे घर उपलब्ध करुन देणे, आयटी सुविधा, तरुणांसाठी रोजगार, शैक्षणिक धोरण, औद्योगिक धोरण, रेल्वे सुविधा वाढविणे, रस्ते दळणवळण सुधारणा व जलवाहतूक, पर्यटन विकास, बंदर विकास करणे आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणी करण्याचा संकल्प महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना – भाजप – आरपीआय (ए)- रासप – शिवसंग्राम – रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या ‘संकल्पनामा’चे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आज (शुक्रवारी)प्रकाशन करण्यात आले. पिंपरीत झालेल्या या कार्यक्रमाला खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार गौतम चाबुकस्वार, महापौर राहुल जाधव, शिवसेनेचे संपर्कनेते बाळाभाई कदम, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, भाजप प्रदेश नेत्या उमा खापरे, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेवक बाबू नायर, अॅड. मोरेश्वर शेडगे उपस्थित होते.

नवी मुंबई आतरराष्ट्रीय विमानतळ

प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सन 2020 पर्यंत चालू करण्याचा केंद्र सरकारचा मनोदय आहे. वेळोवेळी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर हे विमानतळ सुरू करण्याचा माझा प्रयत्न राहील.

रेल्वे सुविधा वाढविणार

पुणे-लोणावळा तिस-या व चौथ्या मार्गाचे काम लवकरच पूर्ण करून लोकलच्या फे-या वाढविणे, रेल्वे मार्ग दुरुस्त करुन विजेचे खांब आणि रेल्वे याच्यांमधील अंतर वाढवणे, पुणे-मुंबई लोकल सेवा, पनवेल रेल्वे स्टेशनचे विस्तारीकरणाचे इत्यादी कामे लवकर सुरू करण्यासाठी पाठपुरावा, गावांना जोडणा-या रेल्वे क्रॉसिंगवर
अंडरपास सबवे निर्मिती

औद्योगिक धोरण

आपल्या भागातील पिंपरी, चिंचवड, पनवेल, तळेगाव दाभाडे, वडगाव, लोणावळा, खोपोली, उरण भागातील उद्योजकांना त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी मदत करणार. मोठे उद्योग आपल्या भागात सुरू व्हावेत. यासाठी उद्योजकांना प्रेरीत करणार. उद्योगांना भेडसावणारे प्रश्‍न सोडविणार. उद्योगांचे स्थलांतर रोखण्याबरोबर त्यांच्यावर अवलंबून असणा-या लघुउद्योगांना संरक्षण मिळावे. यासाठी केंद्रात धोरण तयार करण्यासाठी प्रयत्न. पिंपरी, चिंचवड , तळेगाव दाभाडे एमआयडीसीत गुंतवणूक आणून उद्योगधंदे वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. व तेथे मतदारसंघातील तरूणाईला रोजगार मिळेल यावर लक्ष देण्यात येईल. एच.ए. कंपनीच्या पुनरूज्ञीवन करण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळवून देणार.

तरुणांसाठी रोजगार

ज्या शेतक-यांच्या जमिनीवर उद्योग उभे राहिले आहेत. त्यांच्या कुटुंबातील किमान एका व्यक्तीस कायमस्वरूपी नोकरी मिळावी यासाठी कायद्यात तरतूद करण्यासाठी प्रयत्न. कंत्राटी कामगार कायदा रद्द करून तरूणांना नोकरीत
कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी तरतूद करण्याला प्राधान्य 80% स्थानिक नोकरभरती करण्याच्या शिवसेनेच्या धोरणानुसार पाठपुरावा करणार, तालुकास्तरावर जॉब इन्फर्मेशन केंद्र उघडून तरूणांना रोजगार मिळावा यासाठी
प्रयत्न करणार. अनुसूचित जाती-जमाती तसेच मुस्लिम तरुण-तरुणींसाठी कौशल्य विकासांतर्गत विशेष मार्गदर्शन केंद्र उभारून त्यांना रोजगाराभिमुख करण्यात येईल.

शैक्षणिक धोरण

जिल्हा परिषद तसेच नगरपरिषदेच्या शाळेतून उच्च दर्जाचे शिक्षण, संगणक प्रशिक्षण उपलब्ध करूण देण्यासाठी केंद्रातील योजनांचा पुरेपूर उपयोग केला जाईल. मतदारसंघातील तरूणांमध्ये रोजगाराभिमुख उच्च तंत्रज्ञानातील स्किल डेव्हलपमेंटसाठी विशेष प्रयत्न. शिक्षणाचा बाजार थांबविण्यासाठी शासकीय महाविद्यालये वाढविणे, शैक्षणिक शुल्क कमी करणे, दर्जेदार शिक्षण व शिक्षक वर्ग उपलब्ध करून देणे. त्याचबरोबर कला, क्रीडा या क्षेत्रात करिअर करता यावे. यासाठी धोरण निर्माण करण्यास शासनाकडे पाठपुरावा. पोलीस व सैन्य भरतीसाठी तरूणांना 12 महिने मार्गदर्शन देणारे विशेष केंद्र स्थापन करण्यात येईल. खासदार निधीतून एमपीएससी, युपीएससी परिक्षांसाठी स्पर्धा परिक्षा केंद्र सुरू करण्यात येईल.

रस्ते, दळणवळण सुधारणा व जलवाहतूक

औद्योगिक प्रगतीसाठी रस्ते या रक्तवाहिन्यांचे काम करतात. पंतप्रधान ग्रामसडक योजना, केंद्रीय मार्ग निधी, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारितील रस्ते या मोठ्या योजनांबरोबरच गावं अन्‌ वाड्यावस्त्या मुख्य रस्त्यांना जोडण्याला प्राधान्य देणार. अवलस-पलसदरी महामार्ग, कर्जत-भीमाशंकर रस्ता, पनवेल ते उरणच्या आठपदरीकरणाचे काम, तळेगाव-चाकण-शिक्रापूर-नगर रस्त्याचे सहापदरीकरण व चौपदरीकरणाचे काम लवकर पुर्ण करणार, ररत्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी जलवाहतुकीसाठी प्रयत्न करणार

अनधिकृत बांधकाम नियमित करणे

सामान्य नागरीकांच्या घरकुलांचा विचार करता अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी यासाठी प्रयत्न करणार. पिंपरी कॅम्पातील निर्वासितांच्या घरांसंदर्भातील प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणार, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण जागेतील घरांना नियमित करण्यासाठी पाठपुरावा करणार, पनवेल येथे गरजेपोटी बांधलेल्या घरांना संरक्षण देऊन गावठाण हद्द वाढविण्यासाठी प्रयत्न,

रेड झोन, क्षेपणास्त्र प्रकल्प आरक्षित जमीन समस्या

संरक्षण धोरणानुसार देहुरोड दारूगोळा कोठाराच्या दोन हजार यार्डाच्या संरक्षित क्षेत्रामुळे(रेड झोन) परिसरातील हजारो लोकांना झळ पोहोचली आहे. याप्रश्‍नी केंद्रसरकार आणि संरक्षण विभाग यांच्यासह तोडगा काढण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करणार. देहूरोड कॅन्टोमेन्ट बोर्डातील विकासकामासंदर्भातील रहिवाशांचे प्रश्‍न
आणि जुन्या घरांच्या दुरूस्तीसाठी तसेच कॅन्टोमेन्ट बोर्डासाठी केंद्राकडून अनुदान देण्यासाठी पाठपुरावा करणार. मावळ तालुक्‍यातील क्षेपणास्त्र प्रकल्पासाठी आरक्षित जमीनीचा प्रश्न सोडविणार.

आयटी सुविधा

हिंजवडी आयटी पार्क आणि त्यावर आधारीत सेवांच्या वाढत्या व्यवसायामुळे शहरात देशातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतर होत आहे. शहराच्या बदलत्या स्वरूपानुसार शहर व्यवस्थापनात आवश्यक बदलांची अंमलबजावणी करणार. आयटी पार्क मध्ये स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार.
हिंजवडी, नाशिक फाटा, पिंपरी चिंचवड परिसरात मेट्रोचे जाळे उभारणार.

लघुउद्योग व कामगारांचे प्रश्न

औद्योगिक मंदीच्या काळात परिसरातील विशेषत: लघुउद्योगांच्या समस्या वाढत आहेत. हे उद्योग इतर भागात स्थलांतरीत होऊ नयेत. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे प्रयत्न करणार, ‘जीएसटी प्रणालीचे सुलभीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासंदर्भात दिलासादायक तोडगा निघावा यासाठी सरकारकडे आग्रह करण्यात येईल.

नदी सुधारणा प्रकल्प

नद्यांमधील जलप्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणार. जलप्रदूषण प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी करण्याचा पाठपुरावा करणार. नदीघाट परिसर विकास करणार, पवना, इंद्रायणी, आंद्रा, कुंडलिका, उल्हास, पाताळगंगा, पेज, मुळा या नद्यांना केंद्र सरकारडून निधी मंजूर करुन नदी सुधार प्रकल्प राबविणार,

पर्यटन विकास

मावळ लोकसभा मतदारसंघातील लोणावळा, खंडाळा, माथेरान येथील स्थळांचा पर्यटन विकास करणे. कार्ला, भाजे लेणी व गडकिल्ले यांचाही पर्यटन विकास करून तेथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार. मतदारसंघातील पर्यटन स्थळांच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील.

बंदर विकास

जेएनपीटी बंदरातील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी बंदर विकासाकडे प्राधान्याने लक्ष देणार.

झोपडपट्टी पुनर्वसन

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून झोपडपट्टी धारकांना 500 स्केवअर फुटाचे हक्काचे घर उपलब्ध करून देवून जागा मालकांना देखील विश्वासात घेवून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्प निर्धारीत वेळेत पूर्ण करणार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.