Pune News : एटीएममध्ये छेडछाड करून 96 हजार लंपास

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : रस्त्यावरील एका बँकेच्या एटीएम मध्ये सायबर चोरट्यांनी छेडछाड करत तब्बल 96 हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय. यासाठी चोरट्यांनी वेगवेगळ्या राज्यातील व्यक्तींच्या नावाच्या एटीएमचा वापर केला. याप्रकरणी आश्रय अभय दीक्षित (वय 36) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात आरोपी विरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 

फिर्यादी हे संबंधित बँकेत मॅनेजर आहेत. एटीएममध्ये भरलेली आणि काढलेली रक्कमेचा हिशोब ठेवण्याचे काम ते करतात. सिंहगड रस्त्यावरील एका एटीएमच्या रकमेच्या हिशोबात त्यांना तफावत आढळली. काही ग्राहकांच्या अकाउंट मधून पैसे काढले परंतु ते त्यांना मिळाले नसल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांनी अधिक माहिती घेतली असता हा प्रकार उघडकीस आला आहे.

त्यानंतर फिर्यादीने सदर एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयास्पद अवस्थेत एक व्यक्ती आढळला. कॅश डिस्पेंसर दाबून धरणे, बाहेर आलेले पैसे काढून घेणे यासारख्या हालचाली करताना तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यामुळे एटीएम मधून पैसे निघाल्याची नोंद होत नव्हती. अशाप्रकारे आरोपीने वेगवेगळ्या व्यक्तीच्या एटीएम कार्डचा वापर करून 96 हजार रुपये काढल्याचे निष्पन्न झाले. यासाठी त्याने आठ वेळा एटीएम मशीन सोबत छेडछाड केली.
सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.