Vadgaon Maval : सामुदायिक विवाहसोहळ्यामध्ये 135 जोडपी झाली विवाहबद्ध

एमपीसी न्यूज- मावळ तालुका वारकरी संप्रदायाच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका सामुदायिक विवाह सोहळा समिती व मावळ प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने कान्हे फाटा (ता.मावळ) भक्ती-शक्ती संगम येथे बुधवारी (दि.24) 135 जोडप्यांचा सामुदायिक विवाहसोहळा मोठ्या दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.

मागील पाच वर्षांपासून भक्ती-शक्ती युवा मंच, पवन मावळ विवाह सोहळा समिती व मावळ प्रबोधिनी यांच्या वतीने मावळ तालुक्यात वारकरी संप्रदायाच्या मार्गदर्शनाखाली पवन मावळ व आंदर मावळ या दोन ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. यावर्षी मावळ तालुका वारकरी संप्रदायाने पुढाकार घेऊन मावळ तालुक्यातील अनिष्ठ, रूढी परंपरा मोडून काढून लग्न मुहूर्तावर लावले. समाजाचा वेळ व पैसा याची बचत केल्याने हा भव्य सामुदायिक विवाह सोहळा उपस्थितांचे आकर्षण ठरला.

वधु वरांची भव्य मिरवणूक कान्हे ते भक्ती शक्ती संगम पर्यंत काढण्यात आली. मागील पाच वर्षांत या विवाहसोहळ्याच्या माध्यमातून 200 जोडपी विवाहबध्द झाली असून यंदा 135 जोडपी विवाहबध्द होणार असल्याने लाखो वऱ्हाडी मंडळींसाठी 35 एकर जागेत भव्य मंडप व्यवस्था, बैठक व्यवस्था, वाहनतळ व्यवस्था, भोजन व्यवस्था, 5000 स्वयंसेवक, रुग्णवाहिका तसेच प्रथमोपचार व्यवस्था, परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही अशी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.

हिंदू धर्म संस्कृती प्रमाणे विवाह लावण्यात आले. वधू- वरास प्रत्येकी 3 पोशाख व साड्या, संसारोपयोगी भांड्यांचा संच, गॅस शेगडीसह गॅस कनेक्शन, तसेच याप्रसंगी 10 लकी ड्रॉ काढण्यात आले त्यामध्ये प्रथम विजेते ठरलेले पाचाणे (ता.मावळ) येथील वर सचिन रमेश येवले व वधू ज्योती कचरू घोटकुले यांना मारुती सुझुकी ऑल्टो कार भेट देण्यात आली. मंगेश चिमटे, दत्ता भोईरकर व गणेश भागवत या तीन विजेत्यांना गीर जातीच्या देशी गाई व भगवान भसे, बाबू कोकाटे, अंकुश चिमटे, विशाल कावळे, राहुल असवले, किरण चोरघे या सहा विजेत्यांना लॅपटॉप देण्यात आले.

याप्रसंगी पणनमंत्री सुभाष देशमुख, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपा सचिव संजय पांडे, नागपुरचे महापौर प्रवीण दटके, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, दिगंबर भेगडे, माऊली दाभाडे, भास्कर म्हाळसकर, बबनराव भेगडे, बापूसाहेब भेगडे, अविनाश खळदकर, पनवेलचे उपमहापौर विक्रांत पाटील, निवृतीभाऊ शेटे, ज्ञानेश्वर दळवी, नगराध्यक्ष सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मावळ प्रबोधिनी संस्थापक रवींद्र आप्पा भेगडे, रोहिदास महाराज धनवे, रवी शेटे, नगरसेवक अमोल शेटे, रघुवीर शेलार, नाथा महाराज शेलार, विठ्ठल दादा घारे व सर्व पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक व लाखो वऱ्हाडी उपस्थित होते.

प्रमुख व्यवस्थापक विनित भेगडे, नितीन येवले, संदेश शेलार, बंडू घोजगे, सारंग मराठे, नितीन अडीवळे, माऊली जगताप, विशाल सातकर, संदेश भेगडे, मंगेश शेलार, अमोल आगीवले,संतोष साखरे, उत्तम पवळे, सुनील भेगडे, अमित भेगडे, सागर म्हाळसकर, समाधान भोईरकर, मावळ प्रबोधिनी चे सदस्य व मावळ तालुका वारकरी संप्रदाय सदस्यांनी या विवाह सोहळ्याचे संयोजन केले. विवाह सोहळ्याचे प्रास्ताविक मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रवींद्र भेगडे यांनी केले. वर-वधूंना शुभाशीर्वाद शंकर महाराज मराठे यांनी दिले. आभार मावळ युवा प्रबोधिनीचे अध्यक्ष रवी शेटे यांनी मानले.

या विवाह सोहळ्याची उत्सुकता मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्यात लागून राहिली होती. मागील सहा महिन्यांपासून मावळ प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या नेतृत्वाखाली 198 गावात 109 तरुण मंडळ, 162 महिला बचत गट, कंपनीतील शेकडो कामगार व कार्यकर्त्यांनी तसेच वारकरी संप्रदायाच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन कार्य केले आहे. सुनियोजित विवाहसोहळ्याबद्दल रवींद्र भेगडे यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

सामुदायिक विवाह सोहळ्याला राजकीय रंग

सध्या लोकसभा निवडणुकांचा मोसम सुरु असल्याने या सामुदायिक विवाह सोहळ्याला सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. सर्व पक्षाचे नेते एकाच मंचावर आल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती. आमदार बाळा भेगडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार श्रीरंग बारणे हे एकमेकांशेजारी बसलेले पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.