Maval : मावळच्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघातून मोठी आघाडी मिळेल – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज- मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल, उरण, कर्जत-खालापूर या सहाही विधानसभा मतदारसंघांतून महायुतीचा उमेदवार म्हणून मला मोठी आघाडी मिळेल, असा विश्वास शिवसेना – भाजप – आरपीआय – रासप – शिवसंग्राम – रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची आज (शनिवारी) सांगता झाली. त्यावेळी बारणे यांनी प्रचाराची आणि नागरिकांच्या मिळालेल्या प्रतिसादाची माहिती दिली.

श्रीरंग बारणे म्हणाले, “लोकसभा मतदारसंघात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविल्या आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीला चांगले वातावरण आहे. मतदारसंघातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. त्यामुळे महायुतीचा उमेदवार म्हणून मला सहाही विधानसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येने आघाडी मिळेल”

भाजप-शिवसेना-आरपीआय, महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून प्रचार केला. अपार कष्ट घेतले. या कार्यकर्त्यांचे मी मनस्वी आभार मानतो. महायुतीच्या नेत्यांनी मोठे सहकार्य केले. शिवसेना-भाजप-आरपीआयच्या नेत्यांचे बारणे यांनी आभार मानले. देशाच्या निवडणुकीत 100 टक्के मतदान झाले पाहिजे. त्यासाठी मतदारांनी जागृत राहून आपला मतदानाचा अधिकार बजविण्याचे आवाहनही बारणे यांनी मतदारांना केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.