Nigdi : नदी संवर्धन आणि साहसाचे धडे देत जिप्सी फिल्म फेस्टिव्हल उत्साहात

इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड आणि जिप्सी क्लबचे आयोजन

एमपीसी न्यूज- इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या सौजन्याने आणि जिप्सी क्लब आयोजित निसर्ग आणि साहस या विषयावर आयोजित करण्यात आलेला पिंपरी चिंचवड शहरातील पहिलाच चित्रपट महोत्सव नुकताच संपन्न झाला. चित्रपट महोत्सवात नदी संवर्धनाचे धडे तसेच साहसी कामाची ऊर्जा चित्रपटप्रेमींना मिळाली.

यावेळी शिवराज पिंपुरडे, अलाईव्ह संस्थेचे उमेश वाघेला, निसर्ग सायकल मित्राचे सुनील पाटील, शिवदुर्ग संवर्धन संस्थेचे मनोज राणे, संतोष गोलांडे, रो. अर्जुन दलाल आदी उपस्थित होते.

ख्यातनाम दिग्दर्शक संदीप सावंत यांची ‘नदी वाहते’ या चित्रपटाने या सोहळ्याची सुरुवात झाली. नदीचा काठ सुटला आणि माणसाचे साहचर्य नदीबरोबरचे संपले. मग विविध समस्यांची मालिका आणि त्यातून मार्ग काढण्यासाठीचा प्रयत्नांचा प्रवास म्हणजे ‘नदी वाहते’ यामध्ये दाखवला आहे. नदी हे मानवी जीवनाचे रूपक आहे. नदीचे वाहणे म्हणजे माणसाचे प्रवाही राहणे. नदी थांबली तर माणसाचे जीवन थांबते. म्हणून नदी वाहती राहिली पाहिजे; अशा अंतर्मुख करणाऱ्या नोटवर हा लघुपट संपतो. ना गाणी, ना भडक चित्रण, ना अभिनेता ना अभिनेत्री, असे काहीही नसताना हा लघुपट शेवटपर्यंत प्रेक्षकांना खेळवून ठेवतो.

सिंधुदुर्ग, सावंतवाडी परिसरातील घनदाट जंगल, त्यातून वाहणारी नदी. तिचा खळखळाट, संजय मेमाणे यांचे अफलातून छायाचित्रण आणि संदीप सावंत यांची माध्यमावरील हुकूमत यामुळे हा सिनेमा पाहणे म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच होती. यानंतर चित्रपटाच्या टीमने उपस्थितांशी संवाद साधला. सहज संवादातून नदीची कहाणी अधिकच उलगडत गेली. रोहित वर्तक यांच्या स्लॅक्लाइन खेळावरील सिनेमा दाखवण्यात आला. चित्रपट पाहताना सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. डोंगराच्या दोन कडांना दोर लावून त्यावरून चालत जाण्याचा अनुभव म्हणजे साहसाचा परमोच्च बिंदू. यानंतर रोहित वर्तक यांनीही या खेळविषयी माहिती देत सर्वांशी संवाद साधला.

दुसऱ्या दिवशीची सुरवात ‘नदी मी अनादी मी’ या नदीच्या आत्मकथनपर लघुचित्रपटाने झाली. मानवाकडून नदीवर झालेल्या भयकारी आक्रमणाचे प्रत्ययकारी चित्रण या चिपत्रपटातून झाले. यानंतर आम्ही गिर्यारोहक, डोंबिवली या संस्थेच्या उत्क्रांती या ‘माळशेज क्रॅक आरोहण’, ’12 डेज अँड 24 गिअर्स’ या मनाली ते खर्रडुंगालापास या सायकल मोहिमेवरील आधारित लघुपट राज बाकरे यांनी प्रदर्शित केला. त्यानंतर बाकरे यांनी उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधला. अमित गोडसे यांच्या मधमाशी संवर्धनावर आधारित ‘बी सारव्हायर’ ही फिल्म दाखविण्यात आली. तसेच अमित गोडसे यांनी देखील प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

सगळ्यात शेवटी शिवदुर्ग संस्था, लोणावळा या संस्थेच्या ‘लोणावळा डायरीज’ ही बहुचर्चित फिल्म दाखविण्यात आली. नशापान करून, कधी उन्मादाच्या स्वरूपात निसर्गात भटकताना अपघात होतात. कधी कधी काहींना जीव गमवावा लागतो. अशा वेळी शिवदुर्ग या संस्थेचे गिर्यारोहक स्वतःच जीव धोक्यात घालून बचावाचे काम करतात. याचे चित्रीकरण या फिल्ममध्ये आहे. ‘योग्य ती काळजी घेतली तर शिखर सर करता येते’ हा संदेश घेऊन हा महोत्सव घेण्यात आला. उत्तम लघुपटांच्या सादरीकरणाने हा उद्देश सफल झाल्याची भावना प्रेक्षकांनी व्यक्त केली. इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा प्रतिभा जोशी दलाल यांनी प्रास्ताविक केले. जिप्सी क्लबचे निनाद थत्ते यांनी आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.