या नक्षलवादाचं करायचं काय ?

(हर्षल आल्पे)

एमपीसी न्यूज- नुकतीच एक बातमी वाचनात आली. गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी झुंज देताना आपले पंधरा जवान शहीद झाले. बातमी ऐकुन सुन्न झालो. अनेक जण आपल्या बौद्धिक कुवतीनुसार यावर प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण सरकारला दोष देऊन राजकारणाची पोळी भाजत आहेत. या सगळ्यावर राजकारण करणं हे एकच उत्तर आहे का ? निश्चितच नाही ! मग उत्तर शोधायचं तरी कसं ? खरे तर या नक्षलवादाचे मूळ शोधून त्याचा नायनाट करण्याची गरज आहे.

गडचिरोली आणि आसपासचा भाग नक्षलग्रस्त आहे हे मी जन्मापासुन ऐकतोय. इतके असूनही दहशतीच्या वातावरणातही या निवडणुकीत तिथे चांगले मतदान झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. मग प्रश्न सोडवायला अडचण आहे कुठे ? याच प्रश्नांवरचे बर्‍यापैकी लेख चाळायला लागलो. हे तरुण माओवादी बनतात आणि नक्षलवादी ही बनतात आणि चकमकींमध्ये मरुन ही जातात. त्यांची जागा नवीन लोकं घेतात आणि सगळीकडे अशांतता पसरवतात.

राज्याचे माजी गृहमंत्री आणि एक सच्चा इमानदार माणुस म्हणून ख्याती मिळवलेले दिवंगत आर.आर. पाटील यांचाएक लेख वाचनात आला. त्यात ते असं लिहितात की नक्षलवादाचं मूळ मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर दडलेले आहे. या वाक्याला काहीतरी गुढ असा संदर्भ असणारच. सातत्याने घडणार्‍या घटना जर नीट अभ्यासल्या तर असं वाटतं की ही कीड वेळीच ठेचली पाहिजे. याचं पेस्ट कंट्रोल करायलाच हवं ! मुळात ही कीड कुठल्या पाईपलाईन मधुन येते ती शोधून काढुन तिथेच इंजेक्शन मारले पाहिजे आणि मारलेल्या इंजेक्शनला वाँरंटी देखील असली पाहिजे.

समाजात वंचितपणाची भावना येणे हे सुदृढ समाजाचे लक्षण निश्चितच नाही. या सर्वांना मूळ प्रवाहात आणण्याची गरज आहे. आणि त्यामुळेच विकासाचे केंद्रीकरण फक्त शहरापुरते न करता अविकसित दुर्गम भागातही हा विकास नावाचा मित्र पोहोचला पाहिजे. त्यासाठी पक्ष, जात , धर्म विरहित विचार झाला तर आणि तरच समाज शांत अन सक्षम होइल. पुन्हा एकदा त्या पंधरा शहीदांना सलाम आणि भावपूर्ण आदरांजली …

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.