Chakan : खाणीत पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज – दगडाच्या खाणीमध्ये मित्रांसोबत पोहोण्यासाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तब्बल 24 तासानंतर एनडीआरएफच्या जवानांना मुलाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश मिळाले आहे.

गौतम सुधीर निष्ठुर (वय 17, रा. जाधववाडी, चिखली) असे खाणीत बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गौतम शुक्रवारी (दि. 3) सकाळी साडेदहाच्या सुमारास मित्रांसोबत चाकणजवळ मोई येथे असलेल्या दगडाच्या खाणीमध्ये पोहोण्यासाठी गेला.

मित्रांसोबत पोहत असताना पावणेअकराच्या सुमारास तो पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी स्थानिक नागरिकांना सांगितल्यानंतर नागरिकांनी मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांना गौतमचा मृतदेह सापडला नाही. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) च्या जवानांना बोलावण्यात आले. पाणबुडीच्या साहाय्याने गौतमचा मृतदेह आज (शनिवारी) सकाळी अकराच्या सुमारास शोधण्यात जवानांना यश आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.