चाळीतील नाटकांतून निर्माण झाली नाटकांची आवड – जयंत सावरकर

एमपीसी न्यूज – चाळीत गणेशोत्सवावेळी नाटके केली जात. एकदा त्यात विनोदी भूमिका साकारायला मिळाली तेव्हापासून चाळीतील नाटकांमध्ये भाग घेत गेलो. त्यातूनच नाटकांची आवड निर्माण झाली, असे उत्तर मुलाखती दरम्यान ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांनी दिले. या वर्षी 97 वे अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन उस्मानाबाद येथे होणार असून त्या निमित्ताने नाटय संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांची खास मुलाखत दीनानाथ घारपुरे यांनी घेतली.

ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांची नाट्य विषयक कारकीर्द ही प्रत्येक रंगकर्मीला प्रेरणा देणारी आहे, सुमारे शंभरपेक्षा अधिक नाटकामध्ये त्यांनी सहजतेने विविध भूमिका केल्या असून अनेक नाटकात बदली कलाकार म्हणून कामे केली आहेत, जयंत सावरकर यांनी विनोदी भूमिकेबरोबर गंभीर भूमिका सादर केल्या त्यांचा नाट्य प्रवास दीनानाथ घारपुरे यांनी जाणून घेतला आहे.

नाटकाची आवड निर्माण कशी झाली?

लहानपणापासून आमच्या घरामध्ये रांगणेकर यांची नाटके बघायला जाण्याचा प्रघात होता, मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये कौटुंबिक नाटके बघण्याची पद्धत होती, ‘कुलवधू’ हे नाटक त्यावेळी खूप प्रसिद्ध होते, त्यातील गाणी घरोघरी म्हंटली जायची, त्याचबरोबर आचार्य अत्रे यांची ‘साष्टांग नमस्कार’ पासून सर्वच नाटके मी पहिली आहेत, त्यामुळे नाटक बघण्याची आवड आणि त्यातून कामे करण्याची आवड निर्माण झाली, मी गिरगावात रहात होतो, आमच्या चाळीमध्ये "पाठीराखा" नावाचे नाटक गणेशोत्सवात झाले त्यामध्ये मला गड्याचे काम करण्याची संधी मिळाली, ते काम विनोदी होते आणि मी निरीक्षण करून विनोद करायला शिकलो होतो. त्यामुळे माझे काम चांगले झाले, चाळीतल्या लोकांना ते काम आवडले, मला आठवत आहे की त्यानंतर सात / आठ दिवस तोच रंगवलेला शर्ट वापरत असे, चाळकरी विचारायचे की,, अरे शर्टाला काय लागले आहे ? त्यावेळी मी सांगत असे की काही नाही मी चाळीतल्या नाटकात काम केलं होते ना,, अशी मी स्वतःची पब्लिसिटी करीत असे, मुख्य म्हणजे त्या चाळीमधील नाटकामधून मला नाटकाची आवड निर्माण झाली, त्यानंतर चाळीतल्या गणेशोत्सवात मला लहानसहान भूमिका मिळू लागल्या, पण ते काम काय आहे हे समजून न घेता ते काम मी विनोदी पद्धतीनेच करायचो, त्यावेळी हशा निर्माण व्हायचा पण आता वाटते कि, त्यावेळी मी अभ्यास करून भूमिका सादर करायला पाहिजे होती.

त्याच सुमारास आमच्या बरोबर पुरुषोत्तम बाळ नावाचा मुलगा नाटकात कामे करायचा, पुढे तो दामू केंकरे, नंदकुमार रावते, यांच्या ग्रुपमध्ये गेला आणि त्यांनी कॉलेजमध्ये नाटके सादर केली आणि बक्षिसेसुद्धा मिळवली, तो एक दिवस मला म्हणाला की माझ्याबरोबर चल, आणि तो मला भारतीय विद्याभवनच्या विजया जयवंत यांच्या ग्रुपमध्ये घेऊन गेला तिथे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या "थीफ पोलीस", "केशव प्रधान" आणि "चार दिवस" अशा तीन एकांकिकेचा प्रयोग होता, त्यामध्ये मी बॅकस्टेज कलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली, तेथे नंदकुमार रावते, अरविंद देशपांडे, कमलाकर सारंग, सुलभा देशपांडे, अशी सगळी मोठी मंडळी ती पुढे नावारूपाला आली, हि सर्वजण त्यावेळी उमेदवार म्हणून काम करीत होती, त्यांच्यातील एक उमेदवार म्हणून मी वावरत होतो, त्यावेळी माझ्यावर एक पगडा बसला कि प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय ती गोष्ट करायची नाही, भूमिकेचा अभ्यास म्हणजे काय, काम करायचे म्हणजे नुसतेच पाठांतरच करायचे का ? चेहरा कसा बोलला पाहिजे, देहबोली म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी मला बघायला – अनुभवायला मिळाल्या, आणि त्यातूनच शिकत गेलो.

नाटकातील कामाबरोबर दिगदर्शन करण्याची आवड होती का?

त्यावेळी आमच्या चाळीतील गणेशोत्सवातील नाटके मी दिगदर्शित करीत असे, मी त्यावेळी दामू केंकरे, नंदकुमार रावते यांच्या बरोबर असल्याने चाळीमध्ये माझे जरा वजन बऱ्यापैकी होते, मी दरवर्षी गणपतीच्या उत्सवात नाटके बसवत होतो, सतत काहीतरी शिकत गेलो, मग चाळीत सुरु केले कि जे कोणी नोकरी करीत आहेत त्यांनी दरमहा चार आणे गणेशोत्सवाच्या नाटकासाठी जमा करायचे त्यामुळे मला सारेजण औरंगजेब म्हणायचे, अशी मी नाटकाची हौस भागवीत होतो, चाळीमधील मुली माझ्यावर किती लक्ष ठेवून आहेत ह्याचा अंदाज मी घेत असे पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

नोकरी आणि नाटक याचा मेळ कसा घातला ?

नोकरी म्हणजे मला घरातून सांगितले कि, एक तर पुढे कॉलेज शिक्षण सुरु ठेवा नाहीतर सरळ नोकरीला लागा, आणि आपल्या पायावर उभे राहून आपले पोट भरा आणि काय तुम्हाला जे धंदे [ नाटकाचे]  करायचे असतील ते तुम्ही करत बसा. [ हि गोष्ट मी सांगतोय ती 1956 सालची आहे] मग मी शॉर्टहँड टायपिंग चा कोर्स पूर्ण केला पुढे त्याचा आठ वर्षे अभ्यास केला आणि एक्स्पर्ट स्टेनोग्राफर झालो, त्यामुळे नोकरी मिळत गेली आणि नाटक आले कि मी नोकरी सोडीत असे, अशी धरसोड करीत असल्याने मला नोकरीतील फंड वगैरे काही मिळाले नाही, कारण मिनिमम दहा वर्षे नोकरी कुठेच झाली नाही, एक दिवशी मी नोकरी कायमची सोडली आणि "निष्कांचन" होऊन मी बाहेर पडलो, मी नोकरी सोडली त्यावेळी घरच्यांचा विरोधच होता फक्त बायकोची परवानगी घेतली होती,

मग पुढे रंगभूमीवर नाटकात कामे मिळवण्यासाठी काय केले ?

आचार्य अत्रे यांचे शेवटचे नाटक "सम्राट सिंह" रंगभूमीवर आले होते ते नाटक "किंग लियर" या नाटकावर बेतले [ भाषांतरित] होते, त्यामध्ये मी विदूषकाचे काम [भूमिका] केली होती, ते नाटक अत्रे साहेबांनी धुमाळ यांच्यासाठी लिहिले होते पण धुमाळ सिनेमामध्ये व्यस्त होते, धुमाळांचे आणि नागेश जोशी यांचे लग्नाच्या बेडी मधील "गोकर्ण" आणि "अवधूत" हे काम मी पहिले आहे, "पन्हाळगडचा पठार सगळा" हे गाणे नागेश जोशी यांनी म्हटल्यावर धुमाळ यांनी जी "मान" हलवली होती त्याला जवळ-जवळ दीडमिनिटे प्रेक्षकांनी केलेला टाळ्यांचा कडकडाट मी साहित्य संघात अनुभवला आहे, धुमाळ माझे एक आदर्श होते, त्यांनी माझे "नयन तुझे जादूगार" मधील काम पहिले होते, ते माझ्याकडून "अवधूत"ची भूमिका बसवून घेणार होते पण पुढे तो योग आला नाही,

पहिले नाटक कोणते केले ?

त्या दृष्टीने पहिले तर "नयन तुझे जादूगार" हे होते, त्याच सुमारास मी विश्राम बेडेकर यांच्याकडे दोन-अडीच वर्षे सहाय्यक म्हणून राहिलो होतो त्यामुळे त्यांच्या "वाजे पाऊल आपुले" मध्ये मी काम केलं, त्यासुमारास मी नाटकातील कामाबरोबर हिशोब लिहीत असे, प्रॉम्टिंग करीत असे, प्रॉपर्टी सांभाळत असे, सर्व कामे करीत असे त्यावेळी मला चाळीस रुपये नाईट मिळत असे, मी सारी कामे व्यवस्थित करतो म्हणून मला नाटकात लहानशी भूमिका मिळत असे,

सर्वच कामाचा तुम्हाला अनुभव आला असणारच त्या विषयी सविस्तर सांगा ?

या सर्वच कामाचा मला अनुभव होताच त्यामुळे अनेक ठिकाणी मला बोलावीत असत ते प्रामुख्याने बॅक स्टेज करायला, बारा वर्ष मी बॅकस्टेज केलं, बॅकस्टेज करताना अडचण आली तर मला एखादे चार-पाच वाक्याची भूमिका करायला मिळायची, ती भूमिका मी हौशीने आणि आवडीने करीत असे, त्यामुळे नटाची अडचण आली कि मी तिथे हजर असे, आणि त्यामुळे इतरत्र कंपन्यांमधून सुद्धा मी आयत्यावेळी अनेक नाटकातून भूमिका केल्या त्यामुळे बाहेर सुद्धा इतर ठिकाणी मला कामे मिळत गेली,

त्यातला एखादा किस्सा / अनुभव आठवतोय का ,,, ?

एकदा "लग्नाची बेडी"चा प्रयोग साहित्य संघात होता शरदराव तळवलकर वेळेवर येऊ शकत नव्हते म्हणून मला काम करायला सांगितले मी ते काम केलं त्यांना त्यावेळी एकशे पंधरा रुपये मिळत होते मला फक्त पंधरा मिळाले, पण मी काही कुरबुर केली नाही कारण जो पर्यंत तुम्हाला तुमच्या चेहऱ्याने लोक ओळखत नाहीत तो पर्यंत तुम्हाला कुठल्याही कलेच्या क्षेत्रात, रंगभूमी असो किंवा सिनेमा क्षेत्रात तशी किंमत येत नाही, हे मला निश्चितपणे माहिती होते, रंगभूमीचा प्रसिद्धीचा तुमच्या भोवती वलय असणं [ज्याला ग्लॅमर म्हणतात] ते असण्याचा काय थर्मामीटर आहे हे मला बरोब्बर माहिती होतं, त्याला "फेस व्हॅल्यू" असे आता नाव झाले आहे.

त्यानंतर व्यावसायिक असे कुठले नाटक केले ? आणि तालमी कशा व्हायच्या ?

व्यावसायिक नाटक म्हणजे पैसे घेऊन काम केलेलं नाटक म्हणजे "वाजे पाऊल आपुले", "नयन तुझे जादूगार", "एक हट्टी मुलगी", हे विजय तेंडुलकरांचे नाटक मोहन तोंडवळकर यांनी केलं होत त्यात शरद तळवलकर, कामिनी कदम असे कलावंत होते मला त्यात फक्त त्यावेळी पंधरा रुपये मिळत असत, त्यावेळेला नोकरी करून कामे करणारे कलाकार होते, त्यामुळे संध्याकाळी सहाच्या पुढे दहा – साडे दहा पर्यंत तालमी चालत असायच्या, आणि व्यावसायिक पूर्ण वेळ जे कलाकार काम करायचे ते सकाळी दहा पासून संध्याकाळी सहापर्यंत असायची त्यामध्ये दुपारचे जेवण तेथेच असायचे पण पुढे पुढे दुपारचे जेवण भरपूर झाले कि झोप येते आणि तालीम काही नीट होत नसे त्यानंतर मात्र दुपारी दोन ते संध्याकाळी सहापर्यंत तालमी करीत असे.

त्यावेळचे दिग्दर्शक त्यांच्या तालमीच्या पद्धती कश्या होत्या ?

आत्माराम भेंडे, दामू केंकरे, नंदकुमार रावते हे दिग्दर्शक तुम्हाला करून दाखवत नसत, ते सगळं तुमच्यावर सोडत पण सोडताना त्या भूमिकेच्या विषयी संपूर्णपणे सांगत असत, कस केलं पाहिजे, काय विचार करायला पाहिजे हे शिकवीत असत, त्यामुळे अभ्यास व्हायचा, चर्चा करूनच मग नट आपोआप तयार होत असे, चार – आठ तालमी झाल्या कि त्या कलाकारांमध्ये ती भूमिका भिनायला लागे, पण रामचंद्र वर्दे हे करून दाखवायचे त्यांची ती पद्धत मला चांगली वाटायची कारण आपण केलेलं त्यांनाही ते आवडायचे आणि त्यांनी करून दाखवलेल्या गोष्टीत आपण जर भरणा केला कि त्यांच्याकडून शाबासकी मिळायची त्यामुळे आपल्याला काय सूट होतंय हा विचार नंतर नंतर खूप दिगदर्शक मांडायला लागले, नानासाहेब फाटक यांनी केलेलं काम त्यांच्या प्रकृती समान नट असेल तर तसेच्या तसे होईल पण नसेल तर आपल्या अनुकूल असलेल्या प्रकृती धर्मात ते बसवून घ्यायला पाहिजे, त्यासाठी आपली देहबोली कशी असेल, वागण्याची पद्धत कशी असेल, बोलण्याची पद्धत कशी असेल त्याचा अंदाज घेणं जरुरीचे आहे, आणि तसे करताना चेहऱ्याच्या अभिनयाकडे दुर्लक्ष होता कामा नये, हे ध्यानात ठेवायला लागायचे, असे अनेक विचार मला त्या इतक्या मोठया कलाकारांच्या बरोबर काम केल्यामुळे शिकायला मिळाले, त्यांच्या चर्चा करण्यातून दिसायला लागले, आणि ते मी अनुभवायला लागलो, स्वतःशी मनन करायला लागलो, तालमीला जाताना माझा बराचसा विचार आधी झालेला असायचा आणि मग त्याच्यामध्ये मी लेखक / दिगदर्शक / यांनी काय सांगितले आहे हे त्यांच्याशी गप्पा मारण्याच्या पद्धतीने जाणून घेत असे बाकीच्यांनी – कोणीकाही म्हणण्यापेक्षा "मुंगी होऊन साखर खाणं मला आवडायचे" असे मी आयुष्यभर करतोय.

वाचिक अभिनय कोणी शिकवला या विषयी अनुभव सांगा ?

वाचिक अभिनय शिकवला असे म्हणण्यापेक्षा मी वयाच्या पाचव्या वर्षी गावात गीता जयंतीला पंधरावा अध्याय म्हणला होता [तो संस्कृत आहे] तो मला विष्णूबुवा जोशी यांनी शिकवला होता, जोशीबुवा आमच्या इथले प्रसिद्ध कीर्तनकार होते, हो अध्याय मी न घाबरता न अडखळता म्हणला म्हणून दरवर्षी गीता जयंतीला काही व्याख्यान करायचे असे ठरले ते व्याख्यान मला लिहून दिले जायचे आणि मी ते पाठ करून सादर करायचो ते व्याख्यान पाठ केलेले असले तरी ते आपलेच आहे अश्या पद्धतीने बोलायचो, जोशी बुवा कीर्तनकार असल्याने ते आख्यान लावायचे त्यावेळी म्हणायचे अरे हे सारे पोथ्यांमध्ये लिहिलेले आहे, पण हे मी माझं म्हणून जेव्हा सांगतो त्यावेळी त्यातील काय घ्यायचे आणि काय कमी करायचे ते मी ठरवून कीर्तन करतो, लोकांच्यावर छाप पडेल कशी पडेल हा विचार करतो, हे सारे त्यांनी मला शिकवले त्यामुळे वक्तृत्व कला हि माझ्या अंगात भिनली, शाळेतसुद्धा मला धडे मोठया-मोठयाने वाचायला सांगायचे, ते अर्थपूर्ण पद्धतीने वाचायचो ते सर्वाना आवडायचे आणि मला हि स्वतःला असे वाटायचे कि रुक्षपणे वाचण्यापेक्षा अर्थ समजून घेऊन जर वाचन केलं तर ते अधिक लोकांना आवडत आणि हे सवय पुढे राहिली,

नाटकात काम करताना सुद्धा वाक्यातील अर्थ बाहेर काढून बोलायचे लोकांना तो अर्थ कसा कळेल आणि समोरच्या पात्राला त्यावर प्रतिक्रिया देणे सोपं कसे जाईल हा विचार मनात आणून त्या पद्धतीने मी काम करीत असतो.

आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका केल्या, जास्त विनोदीच केल्या आता मला विनोदी-तसेच गंभीर भूमिकेविषयी सुद्धा सांगा ?

मी 1970 साली "वरचा मजला रिकामा" या नाटकात राजाभाऊ गोसावी यांच्या बरोबर काम केलं त्यात नयना आपटे, बाबा वैशंपायन, बापूराव माने, रा वि राणे, असे अनेक कलाकार होते सगळीच मोठी मंडळी होती, आणि त्यात मी एकच नवखा कलाकार होतो, अरविंद देशपांडे यांनी ते दिगदर्शित केले होते त्या नाटकात त्यांनी मला संधी दिली, माझे लग्न झालेले होते, माझे सासरे नटवर्य मामा पेंडसे नाटक पाहायला आलेले होते, आणि त्यांनी ते काम बघितल्यावर सांगितले कि "तुमच्या प्रत्येक विनोदी कामात तोच – तोचपणा येतोय" वेळीच त्याची दखल घ्या, प्रत्येक वेळी वेगळं करण्याचा प्रयत्न करा, वेगळी स्टाईल हवी हे लक्षांत घ्या, त्या-त्या भूमिकेला अनुसरून बोलण्याची पद्धत हवी"  त्यांनी मला हा उपदेश केला त्यामुळे मला सतत असं वाटत कि आपण मागच्या नाटकात केलंय तेच या नाटकात करीत आहोत, त्यात मग मी बदल करायला सुरुवात केली,

मी नोकरीत असल्याने सतत नाटक करायला मिळत नव्हते, मी 1974 साली "सौजन्याची ऐसी तैसी" या नाटकात काम केलं त्याचे दिगदर्शन शशिकांत निकते यांनी केले होते, आणि त्यांनी मला मी काय करावं हे सांगण्यापेक्षा त्यांनी मला विचार करायला लावला, चाळीत राहणारा माणूस कसा वागेल तो काय करील यावर विचार करायला शिकवलं, आमच्या शेजारी एक दिवेकर नावाचे गृहस्थ राहायचे ते कठडयाला टेकून पाठ खाजवायचे, या सगळ्या गोष्टी मला आठवल्या, एक भिडे नावाचे गृहस्थ येता जाता प्रत्येकाच्या खोलीत खिडकीतून डोकवायचे आणि कारण नसताना प्रश्न विचारायचे या पद्धतींनी मी नाटक खुलवले आणि त्यात शशिकांत निकते यांनी आणखी मार्गदर्शन केलं.

हे सगळं झाल्यानंतर मला स्वतःला पहिली गंभीर भूमिका मिळाली ती "सूर्यास्त" नाटकात, याच कारण सतत विनोदी कामे करून "विनोदमूर्ती" असे लोक म्हणायचे ते मला आवडत नसे, म्हणजे कुठे हि बोलण्याचा हशां व्हायचा गंभीरपणे कोणी घेतच नसे, "सूर्यास्त" मधील गंभीर भूमिका मला कमलाकर सारंग यांनी दिली, त्या अगोदर मी "पर्याय" वगैरे नाटकात काम करीत होतो, त्या नाटकात चंद्रकांत गोखले यांची काही अडचण आली म्हणून मला आयत्यावेळी ते काम करायला सांगितले, साधारणपणे एका नाटकात एक काम केले कि बरचसं नाटक माझे पाठ होत असे, हा गुण मला त्यावेळी उपयोगात आला, मग गोखले नसले कि मला त्यांचे काम करायला बोलवत असत आणि गंभीर भूमिका मला मिळायला सुरवात झाली, सूर्यास्त मुळे शिक्का मोर्तब झालं कि हा गंभीर भूमिका करू शकतो, मग विनोदी नाटके मिळेनाशी झाली, पण जुन्या नाटकातून म्हणजे "भावबंधन" मध्ये कामण्णा, "एकच प्याला" मध्ये तळीराम , "पुण्यप्रभाव" मध्ये नुपूर, "राजसंन्यास" मध्ये जिवाजी कलमदाने, "प्रेमसंन्यास" मध्ये गोकुळ, हि पाचही कामे मला अनेकवार करायला मिळाली, आणि हि पाचही कामे करणारा एकमेव कलावंत आजमितीला जयंत सावरकर हे आहेत, वसंत शिंदे यांनी या सर्व भूमिका केल्या होत्या पण त्यांनी घनःश्याम चे काम केलं नव्हतं पण मी भावबंधन मध्ये घनःश्याम पण केला आहे,

माझ्या सुदैवाने मी अमुक एका प्रांतात वैशिषष्ट्यपूर्ण कामे करतो असं जरी नसलं तरी पण कुठल्याही कामामध्ये याला टाकला तरी हा त्यामध्ये "फिट्ट" बसतो, असं म्हंटल जाते, आणि लोक म्हणायचे कि याला कुठलेही काम सांगा हा ते नक्की चांगलंच करील अशी माझी ख्याती हळू-हळू पसरत गेली. मग मला "पंडितराज जगन्नाथ" मध्ये चित्तरंजन कोल्हटकर यांच्या बदली काम करायला मिळाले, एकदा तर त्याच नाटकात आयत्यावेळी मा दत्ताराम बापू यांचे "मन्सूरखान" चे काम केले, अशी कामे मला चांगल्या – चांगल्या कंपनी मध्ये मिळायला लागली, मग माझं व्यावसायिक नट म्हणून आर्थिकदृष्ट्या सुद्धा पाऊल स्थिरावलं, मी माझ्या मुलांना उत्तम शाळेत उत्तम शिक्षण दिले, उत्तम विचार करण्याची त्यांना सवय लावली, कुठल्याही गोष्टीची त्यांना आवड निर्माण होऊन त्यांच्या आवडीनं ते काम त्यांनी करावी असे विचार करायची सवय लावली, माझी तिन्ही मुले या क्षेत्रात राहिली आहेत, संबंधित आहेत, मुली मात्र आता "हाऊस वाईफ" झाल्या आहेत.

अनेक नाटकात कामे करताना खूप वेळा "रिप्लेसमेंट" म्हणून कामे केलीत अशी एकूण किती नाटके केलीत ?

एकूण एकशे दहा [110] नाटके केली रिप्लेसमेंट अनेक केल्या, "दुरितांचे तिमिर जावो" मध्ये काम करण्याचा किस्सा सांगतो, एक दिवशी दुपारी दीड वाजता भालचंद्र पेंढारकर [अण्णा] भेटले, आणि म्हणाले चला टॅक्सीत बसा आणि शिवाजी मंदिरला माझ्या बरोबर चला, माझं दुरितांचे तिमिर जावो हे नाटक आहे, मी सांगितले मी ते नाटक बघितले आहे, त्यांनी सांगितले कि आता त्या नाटकात तुम्हाला काम करायचे आहे , मी विचारलं कुठच, ते म्हणाले "पंतांची" भूमिका करायची आहे,  एकूण 3/4 काम हे पंतांचे आहे, मी सांगितले कि हे काम आयत्यावेळी मी कसे करणार ? ते म्हणले मला माहित नाही अनेक लोकांनी सांगितलं कि हे काम फक्त सावरकर करू शकतील, माझा प्रयोग बऱ्याच वर्षांनी लागला आहे, आणि प्रयोग  "हाऊस फुल्ल" आहे तो रद्द करणे मला जमणार नाही ललितकलेच्या इतिहासात आत्तापर्यंत कधी नट नाही म्हणून प्रयोग रद्द केलेला नाही, तेव्हा तुम्ही काहीही करा पण हि भूमिका कराच, मी म्हटल ठीक आहे, मी टक्कल लावतो मेकअप करतो अर्धा तास बसतो मला पुस्तक द्या त्यावेळी पुस्तक मिळेना कसेबसे टेपरेकॉर्डर वाल्या कडे पुस्तक सापडले, पुस्तक वाचले आणि बिनचूक सगळे "रिस्पॉन्स". सगळ्या प्रतिक्रिया नीट घेत मी ते काम यशस्वीपणे केले, पेंढारकर खुश झाले, आणि म्हणाले या पुढे तुम्हीच हे काम करा, मी त्यांना सांगितले आजचा प्रयोग रंगदेवतेची कृपा म्हणून चांगला झाला पण पुढील प्रयोग माझी व्यवस्थित तालीम घेऊन मार्गदर्शन करा तरच मला काम करायला सोपं जाईल, एकदा "शिवशंभव" नाटकात मला साडेतीन वाजता विचारले कि त्यात "गांजेकासाची" भूमिका करणार का ? मी म्हंटल हो करिन, पहिल्या पासून माझं एक धोरण होत कि कधी कोणी विचारलं तर मला जमणार नाही असं म्हणायचं नाही, हो करतो असं म्हणायचं, माझ्या सुदैवानं शिवशंभव हे नाटक केशवराव दाते यांनी जेव्हा बसवलं होत त्यावेळी त्यात बाबुराव पेंढारकर, प्रभाकर मुजुमदार, बाळ कोल्हटकर यांनी ती "गांजेकासाची" भूमिका केली होती ती कामे बघून माझ्या मनात ती भूमिका करण्याची इच्छा त्यावेळी झाली होती त्यामुळे ती भूमिका माझ्या मनात कुठेतरी बसलेली होती, मला नाटक बघण्याची आवड असल्याने दुरितांचे तिमिर जावो मधील पंतांची भूमिका आयत्यावेळी करू शकलो, खरं सांगायचं तर ते नाटक मी बावीस वेळा बघितले होते त्यातील शंकर घाणेकर ची बाबुराव गुरव ची भूमिका करण्याचं मनात होते पण मला त्याच्या पुढची मोठी पंतांची भूमिका करायला मिळाली, ते काम मामा पेंडसे अप्रतिम करीत असत,

अश्या तर्हेने रंगदेवतेने माझ्यावर अनेक उपकार केले आहेत, माझ्या मित्रांनी उपकार केले आहेत, श्रेष्ठ – ज्येष्ठ कलाकारांच्या संगतीत दिवस काढले आणि शेवटी "शेण मातीत पडल्यावर ते उचलताना थोडी माती घेऊनच येणारच"

तुम्ही नाटकाची निर्मिती वगैरे केली का ?

हो मी निर्मिती केली, कारण मला जो त्रास झाला तो आणखी कोणाला होऊ नये म्हणून मी "प्रीत फुले स्वप्नात" हे संगीतमय नाटकाची निर्मिती केली, कारण मला गाण्याची खूप विलक्षण आवड होती, हे नाटक निव्वळ जाहिरातीवर हाऊसफुल गेलेलं होत, पण एका प्रयोगाच्या आदल्या दिवशीच्या रंगीत तालमीपर्यंत कपडे पुरवणारा "मगनलाल ड्रेसवाला" याने प्रयोगाच्या दिवशी निरोप पाठवला कि कपडेपटाचे सगळे पैसे द्या आणि मग कपडे घेऊन जा, आमचा अनुभव नाटक करण्याऱ्यांच्या विषयी खूप वाईट आहे, त्यामुळे पैसे घेऊन या आणि कपडे घेऊन जा, त्यावेळी रघुवीर तळाशीलकर यांनी मला खूप मदत केली, नाटक सुरु झालं त्यावेळी गाणारा नट चुकला, प्रभाकर मुजुमदार यांचा आवाज बसलेला होता, नाटक गोंधळात सुरु झालं माझी विनोदी भूमिका होती त्यांनी नाटक थोडं ठीक झालं आणि सात प्रयोगात आम्ही नाटक बंद केलं, देणेकरी सतत सतावीत होते त्यावेळी एक मित्र घरी येऊन म्हणाला " माझे पैसे बुडवणार तर नाहीस ना " त्यावेळी माझी पत्नी निर्मला हिने तिचे दागिने दिले आणि मला त्या माणसाचे पैसे द्यायला लावले, आणि सांगितले कि " कुठलीही गोष्ट करताना, दाराशी कुणीही घेणेकरी येता कामा नये" ते मी पुढे तंतोतंत पाळले, या सगळ्यातून बाहेर पडलो आणि नोकरी सोडली त्या दिवसा पासून "रोखीने" जेव्हढं मला करता येईल तेवढ्याच गोष्टी केल्या, आणि आज पर्यंत ते पाळत आलोय आणि परमेश्वराच्या कृपेने मी "हा भवसागर तरून ती आता स्थिरावलोय"

आजच्या नवीन कलाकारांना काय सांगाल ?

नवीन कलाकारांना मी सांगायचो कि जिभेला वळण लागायला हवे असेल तर जुनी नाटके आपण करायला हवीत, निदान तालमी करून प्रयोग बसवायला काय हरकत आहे, म्हणून "एकच प्याला" मध्ये नवीन संचात उपेंद्र दाते याना सुधाकर म्हणून घेतला, नवीन सिंधू घेतली, तसेच "भावबंधन" नाटक नवीन संचात केले, साठवर्षे प्रयोग न झालेलं "महानंदा" नावाचे नाटक केलं या नाटकात 46 गाणी आहेत, ती गाणी स्वरबद्ध करण्याची जबादारी माझा मित्र अरविंद पिळगावकर यांनी घेतली आणि त्यात भूमिका सुद्धा केली, त्यांनी त्याचे पैसे घेतले नाहीत, सगळ्या नाटकाचा खर्च त्यावेळी चाळीस – पन्नास हजार रुपये आला आणि मला मिळाले फक्त पंधरा हजार, सर्व कलाकारांनी मला त्यावेळी मदतच केली, दुरितांचे तिमिर जावो हे नाटक अण्णा पेंढारकरांनी नवीन संचात केले त्यात मी पंतांची भूमिका केली "मामा पेंडसे" यांची आठवण करून देणारी भूमिका झाली असे सर्वानी त्यावेळी सांगितले, मालतीबाईंनी मला कितीतरी वेळा सांगितले कि तुम्ही मामांचे जावई आहात, पण तुम्ही मामांच्या तोडीस तोड काम करता, तुमची वाणी तितकीच शुद्ध आणि स्पष्ट आहे, माझ्या वाणीवर परिश्रम घेतले ते किर्तनकार विष्णू बुवा जोशी यांनी आमच्या घरी मुळात माझे वडिलांनी अनेकवेळा संस्कृत शब्द आमच्याकडून म्हणून घेतले, जोडाक्षर असेल तर अगोदरच्या शब्दांचा उच्चार कसा करायचा हे खरे शिक्षण मला घरातूनच मिळालं, मी अजूनही पोहायला जातो, "प्राणायाम" करतो म्हणून मी एका दमात वाक्य अजूनही तितक्याच फोर्सने बोलू शकतो, याचा मला सार्थ अभिमान आहे, आणि आता असे वाटते कि शेवटचा श्वास असे पर्यंत रंगभूमीवर मला काम करायला मिळावे, रंगभूमीवर काम करता करता मी कधी गेलो, कुठे गेलो, हे मलाही कळता येऊ नये हि माझी शेवटची इच्छा आहे.

 

दीनानाथ घारपुरे

९९३०११२९९७

[email protected]

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.