Nigdi : मौजमजेसाठी घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक; पावणेदोन लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज – मौजमजेसाठी घरफोडी करणाऱ्या तीन चोरट्यांना निगडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम मोटरसायकल मोबाईल फोन आणि घरफोडीचे साहित्य असा एकूण एक लाख 78 हजार 220 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

स्वप्निल सिद्धाराम माडेकर (वय 25, रा. आनंदनगर चिंचवड), काशीमाप्पा शरणप्पा म्हेत्रे (वय 22, रा. चाकण. मूळ रा. गुलबर्गा), राजेंद्र गंगाधर फाकटकर (वय 38, रा. वाल्हेकरवाडी चिंचवड) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्याचे एक पथक शहरात गस्त घालत असताना पोलीस नाईक रमेश मावसकर व पोलीस कॉन्स्टेबल राहुल मिसाळ यांना माहिती मिळाली की, दोन मुले रावेत कॉर्नरजवळ थांबले असून त्यांच्याकडे चोरीचा मोबाईल फोन आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक दुचाकी (एम एच 14 / जी झेड 3518), मोबाईल फोन, रोख रक्कम आणि घरफोडीचे साहित्य मिळाले. याबाबत चौकशी केली असता चोरट्यांनी चिंचवड मधील युनिक हॉस्पिटल येथून दोन लाख 47 हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल फोन अशी एकूण दोन लाख 57 हजार रुपयांची चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी चोरट्यांकडून अधिक चौकशी करून त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला देखील अटक केली.

तिन्ही आरोपींकडून मोटारसायकल, मोबाईल फोन, घरफोडीचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 78 हजार 220 रुपयांचा ऐवज जप्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.