Chinchwad : पवना नदीपात्रात बेकायदेशीरपणे टाकला भराव; ठेकेदाराचा प्रताप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम करणा-या एका ठेकेदाराने कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे पवना नदीपात्रात भराव टाकला आहे. हा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. यामुळे नदीपात्रातील पाणी गेले अनेक महिने अडविले गेले आहे. त्यामुळे नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहराला चोवीस तास पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. याअंतर्गत शहरातील विविध भागात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. चिंचवड भागातील ठेकेदाराकडून मागील दोन वर्षांपासून हे काम संथगतीने सुरू आहे. मागील काही महिन्यांपासून बेकायदा मातीचा भराव टाकून नदीपात्रातून जलवाहिनी पलिकडे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. थेरगाव पुलाशेजारील नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर हा भराव टाकण्यात आला आहे. भराव टाकण्यापूर्वी परवानगी घेतली नाही. या भरावामुळे नदीपात्रातील पाणी गेले अनेक महिने अडविले गेले आहे. त्यामुळे नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत.

पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत म्हणाले, ”चोवीस तास पाणी पुरवठा जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी नदीपात्रातील पाणी अडविणे गरजेचे होते. त्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाचा बंधारा तयार केला आहे. याबाबत महापालिकेने पाटबंधारे खात्याला पत्र दिले होते. मात्र, त्यांनी परवानगीची गरज नसल्याचे सांगितले आहे. मे अखेरीपर्यंत काम पूर्ण करुन नदीपात्र मोकळे केले जाईल. त्यामुळे पावसाळ्यात कोणताही धोका उद्‌भवणार नाही”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.