Sangvi : ‘आपुन को कोई टच भी नहीं कर सकता’ म्हणणाऱ्या तरुणांना पोलिसांकडून प्रसाद

हातात शस्त्र घेत व्हिडिओ करून टिकटॉकवर केला अपलोड

एमपीसी न्यूज – ‘आपुन को कोई टच भी नहीं कर सकता’ या संजय दत्तच्या चित्रपटातील संवादावर चार तरुणांनी हातात कोयते घेऊन व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ त्यांनी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने टिकटॉकवर अपलोड केला. हा व्हिडिओ सांगवी पोलिसांच्या हाती लागताच पोलिसांनी त्यांचा शोध घेत दोघांना तात्काळ बेड्या ठोकल्या. ‘आपुन को कोई टच भी नहीं कर सकता’ असे म्हणणाऱ्या तरुणांना पोलिसांनी पोलिसांच्या ‘टच’चा अनुभव करून दिला.

अभिजित संभाजी सातकर (वय 22), शंकर संजय बिराजदार (वय 19, रा. पिंपळे निलख), जीवन रानावडे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा नोंदवला. त्यातील अभिजित आणि शंकर या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित, शंकर, जीवन आणि त्यांचा एक अल्पवयीन साथीदार यांनी मिळून पिंपळे निलख मधील कबुतराची ढाबळ येथे 4 मे रोजी एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओत संजय दत्त च्या एका चित्रपटातील ‘अरे पकडने की बात छोड, आपुन को कोई टच भी नहीं कर सकता’ हा संवाद वापरण्यात आला. तसेच यामध्ये चौघांनीही दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हातात कोयता बाळगला आहे. हा व्हिडिओ त्यांनी टिकटॉकवर अपलोड केला. हा व्हिडिओ सांगवी पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी तात्काळ तरुणांचा शोध घेत दोघांना अटक केली. तिस-या आरोपीचा शोध सुरू असून एक मुलगा अल्पवयीन आहे.

‘आपुन को कोई टच भी नहीं कर सकता’ म्हणणा-यांना पोलिसांनी चांगलाच ‘टच’ करण्याचा अनुभव दाखवला. त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी वाकड पोलिसांनी देखील अशाच एका टिकटॉकवर दहशत निर्माण करणाऱ्या बहाद्दरला अद्दल घडवली. त्यानंतर लगेच सांगवी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगरल्याने अशा सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांवर यामुळे पोलिसांचा धाक बसेल अशी आशा निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.