Bhosari : वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहतुकीचा उडाला फज्जा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात प्रशस्त रस्ते झाले. मात्र अतिक्रमणे, हातगाडी, पथारीवाले आणि पार्किंगच्या समस्येने या रस्त्यांना व्यापून टाकले. त्यात वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे ही अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. भोसरी मधील उड्डाणपुलाच्या खाली हातगाडी आणि पार्किंगमुळे सतत वाहतूक कोंडी होते. याबरोबरच पिंपरी मधील डॉ. आंबेडकर चौक, शगुन चौक, चिंचवड मधील चापेकर चौक या ठिकाणी देखील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते.

पुणे-नाशिक महामार्गावर होणारी वाहतूक लक्षात घेत या मार्गावर कासारवाडी, भोसरी आदी ठिकाणी मोठमोठे उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. उड्डाणपुलाच्या खाली स्थानिक वाहतुकीसाठी चारपदरी रस्ता तयार करण्यात आला आहे. यामुळे वाहतूक सुरळीत करण्याचा मानस प्रशासनाचा होता. मात्र वाहतूक पोलीस आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे रस्त्यावर पार्किंग आणि पथारीवाल्यांचा अतिक्रमण वाढले आहे. अर्ध्यापेक्षा अधिक रस्ता त्यात व्यापून गेला आहे. भोसरीत दिवसभर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

भोसरी-चाकण या मार्गावर प्रवासी वाहतूक करणारी वाहने भर रस्त्यात थांबतात. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांनी आपला संसार चक्क पदपथावर देखील थाटला आहे. त्यामुळे नागरिक रस्त्यावरून चालतात. त्यातच हातगाडीवाले आणि किरकोळ विक्रेते देखील भर रस्त्यावर उभे राहतात. प्रवासी वाहतूक करणा-या रिक्षांचीही रस्त्यावर गर्दी असते. त्यामुळे पीएमपीएमएल बस, खासगी वाहनांना मोठा अडथळा होतो. भोसरी परिसरात मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत. त्यात काम करणारा कामगारवर्ग या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक करतो. पोलीस प्रशासनाकडून रस्ता अडविणा-यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. रस्ते मोकळे झाल्यास वाहतूक सुरळीत होईल. ढिम्म प्रशासन या वाहतूक कोंडीतून शहरवासियांना मुक्त करण्याचे सौजन्य दाखवेल का , हा मोठा यक्षप्रश्न शहरवासीयांसमोर आहे.

भोसरी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अरुणराव ओंबासे म्हणाले, “वाहतूक पोलिसांकडून बेकायदेशीररीत्या वाहने पार्क करणा-यांवर दररोज कारवाई करण्यात येत आहे. सर्व रिक्षाचालकांना ठरवून दिलेल्या थांब्यावर रिक्षा थांबविण्यास सांगितले आहे. तरीही चालकांनी रिक्षा अथवा त्यांची अन्य वाहने रस्त्यांच्या बाजूला पार्क केली तर अशा नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.