BNR-HDR-TOP-Mobile

विवाह आणि वैवाहिक जीवन; सोपा होऊ शकणारा एक अवघड प्रश्न

INA_BLW_TITLE

(हर्षल विनोद आल्पे)

एमपीसी न्यूज- सध्या एक घटना खूपच चर्चेत आहे! पुण्यात एका तरुणाने स्वेच्छा मरणासाठी अर्ज करायची इच्छा व्यक्त केली आहे. कारण काय ? तर त्याच्या आई वडिलांना आता घर चालवणं जमत नाहीये, दोघेही आजारी असतात … त्या मुलाला आईवडिलांची देखभाल करणारी, घर सांभाळणारी सुविद्य पत्नी हवी आहे. मात्र लग्न त्याच्याशी करायला एकही मुलगी तयार होत नाहीये. हेच डिप्रेशन घेऊन तो आपले जीवन व्यतीत करतोय. आपण काही न्यायाधीश नाही आहोत. पण जेव्हा आपल्या समाजातला एक घटक जेव्हा असहायपणे इच्छामृत्यूची मागणी करतो तेव्हा विचार हा व्हायलाच हवा एवढं निश्चित !

या मुलाला चांगली नोकरी आहे. कर्तृत्ववान आहे. तरीही आई वडिलांची जबाबदारी नको असल्यामुळे त्याला मुली नकार देत आहेत. तशी स्पष्ट अटच या मुली त्याला घालताहेत. खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण ही एक बाजू जगासमोर आली आहे. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात ना ! त्याला नकार देणार्‍या मुलींची सुद्धा काही बाजू निश्चितच आहे, अन ती चुकीची आपण म्हणू शकत नाही

काही वधू वर सूचक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी जेव्हा मी बोललो तेव्हा ते मान्य करतात की आजकाल विवाहेच्छुक मुली आणि मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या फारच वाढीव अपेक्षा असतात. अनुरुप स्थळ सुचवताना त्या संस्थांच्या नाकी नऊ येतात. एका अशाच कार्यालयात तर असाही प्रश्न ऐकायला मिळालाय की ‘अनुरुप स्थळं आणायची कुठुन? ती काय झाडाला लागतात का?’ खरतर आजकालची करियर आणि सर्वच क्षेत्रातली स्पर्धा जीवघेणी झाली आहे. त्याला कोणीच अपवाद नाही !

प्रत्येकाला इथे चांगली लाईफ स्टाईल हवी आहे. अशा स्थितीत धावत असताना पालकांकडे कोणी बघायचं? या दडपणात कमीत कमी जवाबदारी निभावण्याकडे एकंदर कल वाढू लागला आहे. मुख्य म्हणजे एकत्र कुटुंब पध्दत ही संकल्पना केव्हाच हद्दपार झाल्यामुळे आम्ही गर्दीत स्वतःची स्पेस शोधायला लागतो. त्यात हे असे प्रश्न निर्माण व्हायला लागतात. ज्याची उत्तर आमच्याकडेही नसतात आणि असं दिसतं की मागच्या पिढ्याही हतबल आहेत. .निदान असं दिसतं तरी !

या सगळ्यावर उत्तरं शोधायला हवीत ! मुलांनी बायकोच्या कुटुंबियांना आपलं मानलं आणि तिला हवी ती स्पेस दिली तर आणि मुलींनी मुलाच्या कुटुंबाला आपलं मानलं आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवला, जास्तीच्या अपेक्षांशी ‘यशस्वी तडजोड’ केली तर सगळ्यांच जीवन आनंदी होईल आणि कुणाच्याच मनात आत्महत्या करण्याचा विचार ही येणार नाही ! आमच्या आईवडिलांनी त्यांची स्वतःची स्पेस तर राखावीच, पण आमचीही स्पेस आम्हाला देऊन हे आयुष्य सोप्या पध्दतीने जगायला मदतच करावी. म्हणजे मग यक्षाला देखील हा प्रश्न पडणारच नाही. लग्न करा पण अटींशिवाय…. तो काही दोन देशातला करार नव्हे हा दोन मनांचे आणि कुटुंबाचे मिलन घडवणारा साक्षत्कार आहे. साधे सरळ आयुष्य जगुया की मित्रांनो !

HB_POST_END_FTR-A2

.