Nigdi : रात्रगस्त उपक्रमामुळे मध्यरात्री मिळाले अपघातग्रस्त तरुणाला तात्काळ वैदयकीय उपचार

एमपीसी न्यूज – प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या “जागते रहो” रात्रगस्त सामाजिक उपक्रमामुळे एका अपघातग्रस्त तरुणाला वेळीच मदत मिळून त्याचा जीव वाचण्यास मदत झाली.

पिंपरी- चिंचवड शहरात 2 मे 2019 पासून प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे स्वयंसेवक पोलीस मित्र “जागते रहो” हा रात्रगस्त सामाजिक उपक्रम राबवित आहेत. गेल्या १८ वर्षांपासून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये समितीच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षाहेतू निगडी, प्राधिकरण, आकुर्डी, चिंचवड, चिखली, यमुनानगर या परिसरामध्ये रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत ‘जागते रहो’ हा गस्त उपक्रम राबविला जातो.

आज पहाटे २ वाजण्याच्या सुमारास प्राधिकरण सेक्टर २६ मधील स्वामी विवेकानंद चौकाजवळ महेश कासार (राहणार – सुखवानी कॉम्प्लेक्स – आकुर्डी) या तरुणाच्या दुचाकीचा अपघात झाला त्यामध्ये तरुण जखमी झाला, रक्तबंबाळ परिस्थितीमध्ये सदरचा तरुण रस्त्यावरच बेशुद्धावस्थेत पडलेला गस्तीवरील पोलीस मित्र तेजस सापरिया, अमोल कानु, बाबासाहेब घाळी, विजय मुनोत, अमित डांगे यांना आढळला. त्यांनी तातडीने प्रथमोपचार दिले. भक्तीशक्ती चौक स्थित रिक्षाचालक विशाल गायकवाड हे सुद्धा त्वरित तिथे पोहचले. रिक्षामध्ये त्यांना घेऊन निगडी प्राधिकरणातील लोकमान्य हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये त्यांना तात्काळ उपचार मिळाले. दरम्यान त्यांच्या कंपनीतील सहकाऱ्यांना कळविण्यात आले.

समिती अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागवार रात्रगस्त प्रमुख म्हणून मनोहर दिवाण, बळीराम शेवतें, विजय जगताप, जयेंद्र मकवाना, जयप्रकाश शिंदे, अर्चना घाळी दाभोळकर, अँड. विद्या शिंदे, अजय घाडी, समीर चिले, नितीन मांडवे, विशाल शेवाळे, संदीप सकपाळ, राम सुर्वे, राजकुमार कांबिकर, मंगेश घाग, सतीश देशमुख, लक्ष्मण इंगवले, गोपाळ बिरारी, उद्धव कुंभार, रवी हेळवर, सुनील चौगुले, निलेश चौधरी हे स्वयंसेवक पोलीस मित्र कार्यरत आहेत. सदरचा उपक्रम ५ जून पर्यंत सुरू राहणार आहे.या उपक्रमास निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र निकाळजे हे सुद्धा मार्गदर्शन करीत आहेत. आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरातही आर.पी.एफ जवान एन. भिलकर व स्टेशनमास्तर आर.आर.किशोर यांच्यासमवेत रात्रगस्त उपक्रम सुरू आहे.

या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, “उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घरफोडी व चोऱयांच्या आलेखामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते.अश्या घटनांना आळा घालण्याकरिता समिती गेल्या १८ वर्षांपासून जागते रहो हा रात्रगस्त सामाजिक उपक्रम राबवित आहे.आकुर्डी रेल्वे स्थानकही आता भुरट्या चोरांपासून व गुन्हेगारांपासून भयमुक्त झाले आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.