Maval: श्रीरंग बारणे ठरले पवारांना भारी; कुटुंबातील पार्थचा केला पराभव; मावळात शिवसेनेची हॅट्ट्रिक

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील दिगग्ज राजकारणी असलेल्या पवार कुटुंबातील उमेदवार असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मावळ मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. पवार कुटुंबातील उमेदवार पार्थ यांचा पराभव केल्याने बारणे पवारांना भारी ठरले आहेत. बारणे यांच्या विजयाने मावळवर तिसऱ्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर बारणे सलग दुसऱ्या वेळेस निवडून आले आहेत. झालेल्या 13 लाख 66 हजार 818 मतदानापैकी 11 लाख 24 हजार 744 मतदानाची मोजणी झाली असून श्रीरंग बारणे यांना 7 लाख 13 हजार 701 तर पार्थ पवार यांना 4 लाख 97 हजार 352 मते पडली आहेत.  राजाराम पाटील यांना (वंचित बहुजन आघाडी) 75 हजार 273 मते पडली आहेत. एकूण 13 लाख 53 हजार 084 मतमोजणी झाली. 

मावळमधून 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मावळ लोकसभा मतदारसंघात 22 लाख 97 हजार 405 मतदारापैकी 13 लाख 66 हजार 818 मतदारांनी 2 हजार 504 केंद्रावरांवर मतदानाचा हक्क बजाविला होता. बालेवाडीतील क्रीडासंकुलात सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आघाडी कायम ठेवली. साडे अकरा वाजेपर्यंत बारणे यांनी एक लाखाचे लीड पार केले होते. दुपारीच बारणे यांनी विजयाच्या दिशेने कूच केली.

  • देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा बारणे यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केल्याने बारणे देशभरात चर्चेत आले आहेत. शरद पवार यांचे नातू मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याने महाराष्ट्रासह देशभरातील नेत्यांचे या मतदारसंघाकडे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी पक्षाची राज्यातील ज्येष्ठ नेत्यांची फौज मावळ लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून होती. परंतु त्या फौजेविरोधात संयमीपणे बारणे यांनी खिंड लढवून मावळच्या गडावर भगवा कायम ठेवला.

अजित पवारांना धक्का!

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जात होता. अजितदादा सलग दहा वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. पिंपरी महापालिकेवर 15 वर्ष त्यांनी राज्य केले. मावळ लोकसभा मतदारसंघातून मुलगा पार्थ याचा पराभव झाल्याने अजितदादांना मोठा धक्का बसला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.