Pimpri : अल्फा लावल कंपनीच्या सहयोगातून सायन्सपार्कमध्ये 40 कि.वॉट क्षमतेचा सोलर प्रकल्प 

सौर उर्जा विद्युत निर्मीतीसाठी सायन्स पार्क आणि अल्फा लावल यांच्यात सामंजस्य करार

एमपीसी न्यूज – मोठ्या उद्योगगृहांच्या सामाजिक जबाबदारीच्या (सीएसआर) माध्यमातून व सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क येथे सौरउर्जेचा वापर करुन 40 कि. वॉट क्षमतेचा सोलार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प अल्फा लावल प्रा. लि. कंपनी राबविणार आहे. कंपनी व्यवस्थापन आणि सायन्स पार्क यांच्यात आज (शुक्रवारी) सामंजस्य करार करण्यात आला.

सामंजस्य करार करतेवेळी सायन्स पार्कचे संस्थापक संचालक तथा महापालिकेचे सहशहर अभियंता प्रविण तुपे, अल्फा लवाल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनंत पद्मनाभन, लिगल उपाध्यक्ष निशांत श्रीवास्तव, सीएसआरचे मॅनेजर ललिता वासू, संपर्क अधिकारी देवेन्द्र बिराजदार, सायन्स पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावळे, शिक्षण अधिकारी नंदकुमार कासार, सहशिक्षणाधिकारी सुनिल पोटे उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क ही संस्था जनसामान्यांमध्ये विज्ञान प्रसार व वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीसाठी गेल्या 5 वर्षापासून कार्यरत आहे. सायन्स पार्कमध्ये सुर्यापासून मिळणा-या उर्जेचा उपयोग करून विद्युत निर्मिती करण्याचा अभिनव असा 40 कि. वॉट क्षमतेचा सोलार प्लान्ट या उद्योग नगरीतील प्रतिष्ठीत अशा अल्फा लवाल प्रा. लि. या कंपनीकडून स्थापित करण्याचा मनोद्य व्यक्त करण्यात आला. यासाठी अल्फा लवाल कंपनीच्या वरिष्ठांशी चर्चा करून सी.एस.आर. माध्यमातून सदर प्रकल्प राबविण्यास सदर कंपनीची मंजुरी प्राप्त केली. त्यानुसार आज दि. सायन्स पार्क व अल्फा लवाल कंपनीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

या करारानुसार अल्फा लवाल ही कंपनी सायन्स पार्कमध्ये 40 कि. वॉ. क्षमतेचा सोलार पॉवर प्लान्टची उभारणी करून प्रकल्यातून वीज निर्मिती सुरु करून तीन वर्षापर्यंत प्रकल्पाच्या देखभालीची जबाबदारीही घेणार आहे. या प्रकल्पामुळे सायन्स पार्कला लागणारी बहुतांशी वीजेची गरज भागणार आहे व वीजबीलापोटी होणा-या प्रतिमास सुमारे 60 हजार रुपये खर्चात बचत होऊन सायन्स पार्क या स्वायत्त संस्थेस आर्थिक दिलासा मिळणार आहे.

सायन्स पार्क ही स्वायत्त संस्था असल्याने कोणतेही आर्थिक अनुदान मिळत नसल्याने व सदर संस्था किमान खर्चात चालविली जात असल्याने आर्थिकदृष्ट्या हा प्रकल्प विशेष लाभदायी ठरणार आहे. तसेच दरवर्षी सुमारे दोन लाख प्रेक्षक सायन्स पार्कला भेट देतात. या प्रेक्षकांनाही सोलार विद्युत प्रकल्पाची उपयुक्तता व आवश्यकता यांचे महत्व समजून प्रसार होणार आहे व उत्तेजन मिळणार आहे. तसेच याव्दारे प्रतिवर्ष कार्बन फुट प्रिंन्टची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. या प्रकल्पास सुमारे 30 लाखपर्यंत खर्च अपेक्षित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.