Pune : पोटच्या मुलाने नाकारले तिथे पोलिसांनी स्वीकारले!

घरचा पत्ता विसरलेल्या 65 वर्षीय महिलेला तीन दिवस पोलिसांनी सांभाळले

एमपीसी न्यूज – रक्ताच्या नातीपेक्षा माणुसकीचं नातं श्रेष्ठ असतं हे याचा प्रत्यय घर हरवलेल्या 65 वर्षीय ज्येष्ठ महिलेला आला. पोटच्या पोराने नाकारलेल्या या महिलेचे अन्य नातेवाईक मिळेपर्यंत स्वतःच्या आईप्रमाणे दत्तवाडी पोलिसांनी त्यांची जपणूक केली. त्यामुळे पोलिसांमधील माणुसकीचे पुन्हा एकदा दर्शन घडले.

सोनाबाई भोसले असं यांचं नावं. सोनाबाई या तीन दिवसांपूर्वी दांडेकर पूल वर स्वतःचा पत्ता विसरला म्हणून भटकत होत्या. त्यांना नागरिकांनी दत्तवाडी पोलीस स्टेशनला पोहोचवले. पोलिसांनी त्यांच्या मुलाचा फोन नंबर मिळवून त्याला फोन केला असता त्याच्या बायकोने फोन उचलला. पोलिसांकडून तिला आपली सासू हरवली हे लक्षात आलं. ती वारजे भागात राहायला आहे पण नक्की कोठे राहते हे काही तिने सांगितले नाही व परत फोन केला असता तिने आपला फोन बंद केला.

त्या नंतर मुलीचा पत्ता शोधून काढला आणि तिच्यापर्यंत निरोप पाठवला. तिचे घर किवत तालुका भोर येथे असल्याने तिला पावसात रस्ता बंद असल्याने येता आले नाही. म्हणून त्या महिलेला ३ दिवस दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सांभाळले व आज स्वतः पोलीस उपनिरीक्षक मंगेश साळवी, पोलीस कॉन्स्टेबल सागर नारगे, प्रज्ञा खोपडे, संध्या काकडे यांनी किवत, भोर येथील जावई मोहन यादव व मुलगी शैला यादव यांच्या घरी खाजगी गाडीने नेऊन त्यांच्या ताब्यात दिले आहे.

ज्या ठिकाणी पोटचा मुलगा आईची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतल्यावर आईला वाऱ्यावर सोडून देतो तिथे कर्तव्य भावनेतून पोलिसांनी माणुसकीच्या पलीकडे केलेल्या कार्याबद्दल तिच्या सर्व नावतेवाईकांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.