लढत जेतेपदाची-ऑस्ट्रेलियाची शानदार सुरुवात

स्मिथ आणि हेड जोडीने भारतीय गोलंदाजी बोथट ठरवत केली नाबाद 250 धावांची मजबूत पायाभरणी.

एमपीसी न्यूज: (विवेक कुलकर्णी)जागतिक कसोटी विश्वकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज ऑस्ट्रेलियन संघाने अडखळत्या सुरुवातीनंतर शानदार पुनरागमन करत ट्रेविस हेड आणि स्टीवन स्मिथच्या जबरदस्त नाबाद खेळीच्या जोरावर पहिल्या दिवशी 3 बाद 327 धावा करत सामन्यात पहिल्याच दिवशी वर्चस्व निर्माण करण्यात यश मिळवले आहे.

लंडनच्या ओव्हल या ऐतिहासिक मैदानावर कसोटी स्पर्धेच्या जेतेपदासाठीचा एकमेव सामना भारत(1)आणि ऑस्ट्रेलिया(2)संघादरम्यान आज सुरू झाला,ज्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहीत शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितने आज अंतीम अकरात रवीचंद्रन अश्विन ऐवजी शार्दूल ठाकूरला संघात घेत सर्वानाच  आश्चर्याचा धक्का दिला. धक्का याचसाठी की याच अश्विनने कसोटीच्या विश्वकप स्पर्धेत सर्वाधिक बळी घेतले होते.

ऑस्ट्रेलियन संघाच्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली, चिवट पण मोठी खेळी करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उस्मान ख्वाजाला मोहम्मद सिराजने सामन्यातल्या चौथ्याच षटकात एका जबरदस्त चेंडूवर चकवले आणि यष्टीमागे कोडा भरतने त्याचा झेल घेत ख्वाजाला भोपळाही न फोडू देता तंबूत परत पाठवून भारतीय संघाला मोठे यश मिळवून दिले.

मात्र या नंतर ऑस्ट्रेलियन संघाला अनुभवी डेविड वॉर्नर आणि लांबूशेन या जोडीने दमदार खेळी करत चांगलेच सावरले. दोघेही उत्तम खेळत आहेत असे वाटत असतानाच शार्दूल ठाकूरने  वॉर्नरला वैयक्तिक 43 धावांवर बाद करून ही जोडी फोडून भारतीय संघाला मोठेच यश मिळवून दिले.या जोडीने  दुसऱ्या गड्यासाठी 69 धावांची दमदार भागीदारी करुन डाव बऱ्यापैकी सावरला होता,

यानंतर खेळायला आला तो माजी कर्णधार स्मिथ,मात्र ही जोडी जमन्या आधीच मोहम्मद शमीने लांबूशेनला त्रिफळाबाद करून भारताला तिसरे मोठे यश मिळवून दिले, यावेळी ऑस्ट्रेलियन संघाची धावसंख्या 3 बाद 76 अशी दिसत होती, यावेळी रोहीतने प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य ठरलाय असेच वाटत होते, यावेळी स्मिथला साथ देण्यासाठी मैदानावर आला तो डावखुरा ट्रेविस हेड.

त्याने अतिशय सकारात्मक खेळी करत आक्रमक अंदाजात धावा जमवायला सुरुवात केली,त्याची आक्रमकता बघून दुसऱ्या बाजूला असलेल्या स्मिथने त्यालाच जास्तीत जास्त खेळायला संधी देत दुसरी बाजू लावून धरली ,ज्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा 300 च्या पुढचा टप्पा गाठण्यात मोठेच यश आले होते. हेडने फारच सुंदर आणि आक्रमक फलंदाजी करत आपले 6 वे कसोटी शतक पूर्ण केले.त्याच्या फलंदाजीत आक्रमकता आणि आकर्षकता याचा खूपच सुंदर असा मिलाफ दिसून आला,त्याच्या या खेळामुळे स्मिथलाही धावा जमवणे सोपे झाले.

स्मिथची फलंदाजी बघायला कधीही आकर्षक वाटत नाही , पण तो खूप झुंजार खेळाडू आहे, त्याला आपल्या कसोटी कारकिर्दीतल्या  9000 धावा गाठण्यासाठी आता फक्त काहीच धावा शिल्लक आहेत,आफ्रिका दौऱ्यात त्याने केलेल्या चुकीमुळे त्याच्यावर आलेल्या बंदीमुळे कितीतरी धावा बुडाल्या, मानहानी झाली ती वेगळीच, पण याने ते सर्व मागे टाकत केवळ आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले,ज्याचे फळ त्याला आणि अर्थातच संघालाही मिळत आहे,त्याने आजही तशाच पध्दतीने खेळ करत आपले अर्धशतक तर पुर्ण केलेच,पण तो आजच्या दिवसाचा खेळ समाप्त झाला तेंव्हा आपल्या 31 व्या शतकाच्या फक्त पाच पावले दूर आहे.

स्मिथचे सातत्य म्हणूनच वाखाणण्याजोगे आहे,त्याचा साथीदार हेडने आज आपल्या छोट्याशा कारकिर्दीतली एक अविस्मरणीय खेळी करत आजचा दिवस निर्विवादपणे आपल्या नावावर केला.त्याने 156 चेंडूत 22 चौकार आणि 1 षटकार मारत जवळपास 100च्या सरासरीने धावा चोपल्या, आजचा खेळ समाप्त झाला तेंव्हा तो 146 धावा करून नाबाद आहे,तर स्मिथने नाबाद 95 धावा करण्यासाठी 227 चेंडू खेळून काढले, ज्यात केवळ 14 चौकार सामील आहेत.याजोडीने चौथ्या गड्यासाठी 251 धावांची नाबाद आणि मजबूत भागीदारी करत आपल्या संघाला मजबूत स्थितीत आणून ठेवले आहे.

भारतीय संघासाठी शार्दूल,शमी आणि सिराजने प्रत्येकी एकेक गडी बाद केला तर जडेजाला 14 षटके टाकूनही एक सुध्दा बळी मिळवता आला नाही, अश्विनला बह बसवण्यात भारतीय थिंक टॅंकने घेतलेली भूमिका योग्य की अयोग्य हे पुढील चार दिवसांत कळेलच,पण जागतिक कसोटी विश्व कप स्पर्धेच्या जेतेपदाच्या लढतीत पहिल्या दिवशी तरी कांगारू संघाने आपला दबदबा निर्माण केला आहे, हे मान्य करावेच लागेल.कसोटी सामन्यात प्रत्येक दिवस नवा असतो,इथे प्रत्येक सेशनमध्ये खेळ बदलतो, भारतीय गोलंदाज आजचे पहिल्या सेशन मधले यश लक्षात ठेवून उद्याही लंचच्या आत ऑस्ट्रेलियन संघाला 400च्या आत गुंडाळू शकले तर कोण जाणो भारतीय संघही या अंतिम लढतीत पुन्हा एकदा दावेदार ठरू शकतो, उम्मीदपर तो दुनिया कायम है,या अविस्मरणीय डायलॉगची आठवण आज काढायला काय हरकत आहे?

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया
3 बाद 327
वॉर्नर 43,लांबूशेन 26,स्मिथ नाबाद 95,हेड नाबाद 146
शमी 77/1,सिराज 67/1,ठाकूर 75/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.