Pimpri Crime News :उद्योजक अमर मूलचंदानी यांच्यासह 28 जणांविरोधात गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज – बनावट दस्त नोंदणी व ब्लॅकमेल करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दि सेवा विकास बँकेचे अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्या सह तब्बल 28 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 12) पिंपरी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अनिता किशोर चव्हाण (वय 60, रा. एन आय बी एम रोड, महमंदवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि सेवा विकास बँकेचे अध्यक्ष अमर मूलचंदानी, अशोक मूलचंदानी, मनोहर मूलचंदानी, दया मूलचंदानी यांच्यासह तब्बल 28 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी अनिता यांची बनावट कागदपत्रे तयार करून सह. दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट महिला सादर केली व दस्त नोंदणी केला. आरोपींनी फिर्यादी महिलेच्या पतीला बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली. बॅंकेच्या पदाधिकारी यांनी संगनमताने 1 कोटी 25 लाख रुपये मंजूर करून आपापसांत खात्यावर वर्ग केले. 25 लाख रुपयांची रक्कम काढून चेअरमन व इतरांनी वाटून घेतली, असं फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, दि सेवा विकास को-ऑप बँकेतील कथित घोटाळा प्रकरणी पोलिसांनी रविवारी (दि. 07) रात्री उद्योगपती व माजी उपमहापौर अमर मूलचंदानी यांना ताब्यात घेतले. न्यायालयाने मूलचंदानी यांना 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांनी 2010 ते 2019 पर्यंत 238 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या गुन्ह्याप्रकरणी मूलचंदानी यांना रविवारी रात्री आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.