Pune News : शिरूरमध्ये केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पुण्यात भाजप नेत्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका जाहीर भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका करताना महिलांबाबत वादग्रस्त विधान केले होते. हेच विधान त्यांना भोवले असून त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार भादवी कलम 509 नुसार प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, प्रवीण दरेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिरूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात केलेल्या भाषणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे अशी टीका केली होती. यानंतर चहूबाजूने दरेकर यांच्यावर टीका करण्यात आली होती.

दरम्यान लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार होत्या. त्याच पार्श्वभूमीवर दरेकर यांनी हे वक्तव्य केल्यामुळे स्त्री म्हणून ते लज्जा उत्पन्न करणारे असल्याने चाकणकर यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.