Chikhali News : ‘आमची सूत्रे येरवडा जेलमधून हलतात’ म्हणणाऱ्या स्वयंघोषित भाईवर गुन्हा दाखल

आयुक्त म्हणाले, 'अशा भाईंचे जीवन सन्मानाचे नाही'

एमपीसी न्यूज – पैलवानी आवेशात मांडी ठोकून ‘आमची सूत्रे येरवडा जेलमधून हालतात’ असे म्हणत व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या स्वयंघोषित भाईला गुंडा विरोधी पथकाने अटक केली. त्याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयूर अनिल सरोदे ऊर्फ यमभाई (वय 21, रा. दुर्गानगर, निगडी-भोसरी रोड, आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मयूर याने सोशल मीडियावर हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोन पोस्ट अपलोड केल्या होत्या. त्यामध्ये त्याने कोयता दाखवून दहशत निर्माण केली होती. तर तिसऱ्या पोस्टमध्ये त्याने ‘आमची सूत्र येरवडा जेलमधून हालतात’, असे म्हणत थेट पोलिसांनाच आव्हान दिले होते.

याबाबत गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्याची तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती काढली आणि त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर याच्यावर यापूर्वी गंभीर दुखापत करण्याचा गुन्हा दाखल आहे.

याबाबत बोलताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “काही लोक भीती किंवा स्वतःच्या स्वार्थापोटी अशा लोकांना भाई म्हणतात. पण त्यांचे हे जीवन सन्मानाचे नाही. स्वतःची ओळख निर्माण करण्याची हौस दुसऱ्या मार्गानेही पूर्ण करता येते. समाजसेवा, चांगली कामे, अभ्यास करून स्वतःची ओळख निर्माण करता येईल. गुन्हेगारांची लाईफ अगदी छोटी असते.

गुन्हेगारांना अनेकदा पोलीस ताब्यात घेतात. त्यांना तुरुंगात टाकतात. लोक त्यांच्याकडे तिरस्काराने बघतात. ही बाब गुन्हेगारीकडे वळणाऱ्या प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. गुन्हेगारीच्या दुष्टचक्रात अडकू नका, वेळीच बाहेर या असा सल्ला देखील आयुक्तांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.