Pune News : अनाथ अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करवून घेतल्याप्रकरणी तृतीय पंथीयांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : अनाथ अल्पवयीन मुलीला वाममार्गाला लावत तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. यातून ही मुलगी गर्भवती राहिली आणि तिने ससून रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी तृतीयपंथी महादेव उर्फ भारती कोळी आणि माया महादेव उर्फ आरती काळे ( दोघेही कलवड जकात नाक्याजवळ, धानोरी) यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीच्या आई वडिलांचे निधन झाले असून ती एका ओळखीच्या महिलेसोबत लोहगाव परिसरात वास्तव्यास आहे. जानेवारी 2020 मध्ये तिची वरील आरोपींची ओळख झाली होती. आरोपींनी या ओळखीचा गैरफायदा घेत तिच्याकडून वारंवार वेश्याव्यवसाय करून घेतला आणि त्यातून मिळालेल्या पैशातून स्वतःचा उदरनिर्वाह केला.

यादरम्यान पीडित मुलगी गर्भवती राहिली आणि ती 9 जानेवारी रोजी ससून रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.  विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.