Lonavala News : आयएनएस शिवाजी परिसरात ड्रोन उडविणार्‍या युवकावर गुन्हा दाखल

एमपीसीस न्यूज :  लोणावळा येथील आयएनएस शिवाजी कॅम्प मेन गेट व एअरफोर्स स्टेशन परिसरात आकाशात ड्रोन उडवत शुटिंग करणार्‍या युवकावर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

आयएनएस शिवाजी मेन गेट व एअरफोर्स स्टेशन परिसरात कोणीतरी अज्ञात व्यक्ती ड्रोन उडवून शुटिंग करत असल्याची माहिती (प्रोव्हिस) आयएनएस शिवाजी येथील नेव्हल पोलिसांकडून लोणावळा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांच्या आदेशान्वये व सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी व त्यांच्या टिमने सदर व्यक्तीचा शोध घेत त्यावर गुन्हा दाखल केला आहे.

व्यंकटेश तेजस बोमन्ना (वय 26, रा. जनता वसाहत गल्ली नं. 71, राममंदिर पर्वती, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. विना परवाना ड्रोन उडविणे हा कायद्याने गुन्हा असून असे कृत्य करताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल असे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.