Pune News : पिंपरी-चिंचवड च्या माजी महापौरांच्या मुलासह तीन जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक; एकाला अटक

एमपीसी न्यूज : लिपिक आणि शिपाई पदाची बनावट कागदपत्रे तयार करून ती शासनाकडे सादर केली. त्याद्वारे शासनाकडून पैसे घेत शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे. तर याप्रकरणात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी महापौरांच्या मुलाचा देखील समावेश आहे. हा प्रकार फसवणुकीचा जून ते सप्टेंबर 2016 या कालावधीत घडला आहे.

संस्था सचिव गौरव अशोक कदम, संभाजी सुभाष शिरसाट, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचा तत्कालीन वेतन पथक अधिक्षक यांच्या विरुद्ध फसवणुक, बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा परिषदे प्राथमिक विभागतील भविष्य निर्वाह निधी विभागाचे अधिक्षक राजेंद्र साठे (वय 46, रा.शनिवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुबोध शिक्षण संस्था नावाची शैक्षणिक संस्था पिंपरी-चिंचवड शहरात आहे. या शिक्षण संस्थेचे सचिव गौरव कदम आहेत. कदम आणि शिक्षक संघटना पदाधिकारी संभाजी शिरसाट यांनी सुबोध विद्यालयाच्या नावाने लिपीक व शिपाई या दोन पदासाठी बनावट कागपत्रे तयार केली. बनावट वैयक्तिक मान्यता तयार करुन त्या खोट्या असुनही ख-या असल्याचे शासनाला भासवले.

त्याद्वारे आरोपींनी जून ते सप्टेंबर 2016 या कालावधीची वेतन देयक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या वेतन देयक पथकाकडे पाठवून दिली. त्यानंतर वेतनापोटी एक लाख 46 हजार 603 रूपये इतके पैसे घेऊन शासनाची फसवणूक केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राजेंद्र साठे यांनी याबाबत पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला.

पोलिसांनी संभाजी शिरसाट याला शुक्रवारी रात्री अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडुन केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.