Pune News : धुक्यात हरवलं शहर, संपूर्ण शहरावर धुक्याची चादर

एमपीसी न्यूज : गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. त्यात मधूनच सूर्यनारायणाच्या प्रखर किरणाने जाणवणारा उष्मा याचा अनुभव घेतलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना आज पहाटे संपूर्ण शहरावर धुक्याची चादर पहायला मिळाली.

पुणे शहरात गेले काही दिवस सकाळी अगदी कडक उन्हाचा चटका जाणवत होता. त्यानंतर दुपारी अचानक आकाशात ढगांची गर्दी होत आहे.  येत्या काही दिवसांत पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.  असे असताना आज पहाटे फिरायला बाहेर पडलेल्याना एक वेगळेच दृश्य दिसले. संपूर्ण शहरावर धुक्याची चादर पसरल्याचे पहायला मिळाले. शहरातील टेकडीवर पहाटे फिरायला जाणाऱ्यांची पुण्यात मोठी संख्या आहे. त्यानी आज ह्या धुक्याचा मनमुराद आनंद घेतला.

दरम्यान पिंपरी चिंचवडसह शहर परिसरात थंडीचा कडाका वाढला, त्यामुळे सर्वत्र दाट धुक्याची झालर पसरलेली दिसली. पिंपरी, चिंचवड, रावेत, आकुर्डी, देहूरोड, निगडी, तळेगाव, वडगाव यांसह मावळ भागात देखील दाट धुके होते. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत धुक्याचा प्रभाव कायम होता.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या आठवड्यापासून किमान तापमानात घट होत असल्याचे स्पष्ट झाले होते. वातावरणातील बदलाचा परिणाम घडून,  बुधवारी पहाटेच्या वेळी धुके असल्याचे दिसून आले. सकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान घराबाहेर पडलेल्यांना धुक्याची दुलई अनुभवण्याची संधी मिळाली. अनेकांनी मोबाइलमध्ये दृश्य टिपण्याचा प्रय़त्न केला.

पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती (एक्स्प्रेस-वे) मार्गावर दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. वाहनचालकांना अगदी काही अंतरावरचेही स्पष्ट दिसत नव्हते. त्यामुळे वाहनांचा वेग आपोआप कमी झाला. वाहनांचे दिवे लावून प्रवास करावा लागला. हीच परिस्थिती शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही होती. पहाटे कामाला जाणारे कामगार अंगात स्वेटर आणि डोक्याला मफलर गुंडाळून जाताना दिसले. पहाटे व्यायाम किंवा फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी धुक्याचा मनमुराद आनंद घेतला. सूर्योदय झाल्यानंतरही काही काळ त्याचे दर्शन होऊ शकले नाही. शाळेत जाणाऱ्या बालचमूंनी धुक्याची चादर अंगावर घेऊन, उबदार कपड्यातून प्रवास केला. पायी वाट धरली. अनेक वाहनचालकांनी रस्त्याच्या कडेला काही काळ थांबून धुके निवळण्याची वाट पाहिली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.