Pimpri : एटीएम बंद असल्याने कॉसमॉस बँकेत पैसे काढण्यासाठी खातेदारांची गर्दी

एमपीसी न्यूज- कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील अनेक खात्यांच्या डेबिट कार्डाची माहिती चोरून बँकेच्या सर्व्हरमधून अज्ञात व्यक्तीने बँकेच्या तब्बल 94 कोटी रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार नुकताच घडला. बँक प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव तीन दिवस बँकेचे एटीएम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खातेदारांनी पैसे काढण्यासाठी बँकेच्या शाखांमध्ये धाव घेतली आहे. पिंपरी मधील कॉसमॉस बँकेच्या शाखेत आज (गुरुवारी) मोठी गर्दी झाली.

पिंपरी मधील तपोवन रोडवर कॉसमॉस बँकेची शाखा आहे. या शाखेमध्ये आज सकाळपासूनच मोठी गर्दी बघायला मिळाली. १५ ऑगस्ट निमित्त बँकांना सुट्टी असल्याने दिवसभराचे खोळंबले व्यवहार पूर्ण करण्यासाठी तसेच बँकेचे एटीएम बंद असल्याने पैसे काढण्यासाठी ही गर्दी झाली होती. बँकेतील सर्व खातेदारांची पैसे सुरक्षित असल्याचे बँक प्रशासनाने स्पष्ट केल्यामुळे खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर दोन ते तीन दिवस तांत्रिक कारणांसाठी कॉसमॉस बँकेचे एटीएम बंद ठेवण्यात आले आहेत.

कॉसमॉस बँकेच्या गणेशखिंड रस्त्यावरील मुख्यालयात 11 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते रात्री 10 च्या दरम्यान आणि 13 ऑगस्ट रोजी हा ऑनलाईन चोरीचा प्रकार घडला. या घटनेमुळे बँकिंग विश्वात खळबळ उडाली. गणेश खिंड रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील एटीएम स्विच सर्व्हरवर अज्ञात मालवेअरचा हल्ला करून अनेक खातेदारांच्या डेबिट कार्ड, रुपी कार्डाची माहिती चोरून त्याद्वारे 94 कोटी रुपये हॉंगकॉंगच्या हान्सेन्ग बँकेत ट्रान्सफर करून रक्कम काढल्याचे उघडकीस आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.