एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर एका व्यक्तीने अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. 17) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. आत्महत्या करणारी व्यक्ती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर आहे.
महेंद्र अच्युतराव चाटे (वय 31, रा. मोशी) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
डॉ. चाटे हे बीव्हीजी इंडीया या ठेकदार कंपनीमार्फत वायसीएमच रुग्णालयात लसीकरण केंद्रांवर कंत्राटी तत्वावर काम करतात. गेल्या दोन महिन्यांपासून ठेकेदार कंपनीने चाटे यांचा पगार दिला नाही. तसेच पगारात कपात केली जाते. सुटी दिली जात नाही. यामुळे डॉ. चाटे त्रस्त झाले होते.
या नैराश्यातून ते शुक्रवारी दुपारी महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ आले आणि अचानक अंगावर डिझेल ओतून घेण्यास सुरूवात केली. हा प्रकार निदर्शनास येताच महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी धाव घेत डॉ. चाटे यांना रोखले. त्यांच्या हातातील लायटर ताब्यात घेतला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.