Dehuroad News : मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या वडिलांना बेदम मारहाण

दोघांवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या वडिलांना आणि त्यांच्या दोन मुलांना दोघांनी बेदम मारहाण केली हा प्रकार गुरुवारी (दि. 10) सायंकाळी श्रीकृष्णनगर. एम बी कॅम्प. देहूरोड येथे घडला. याबाबत दोघांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुणाल वाल्मिकी (वय 21, रा. एम बी कॅम्प, देहूरोड) आणि एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कुणाल याला अटक केली आहे. याबाबत विजय करतारे रजोरा (वय 36, रा. श्रीकृष्णनगर, एम बी कॅम्प, देहूरोड) यांनी शनिवारी (दि. 12) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा शिवा याला कुणाल याने मारहाण केली. त्यामुळे फिर्यादी कुणाल याला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी एका अल्पवयीन मुलाने फिर्यादी यांचा मुलगा शिवा याला शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने पाठीवर, कमरेवर मारहाण केली. तसेच दुसरा मुलगा करण याला देखील खांद्यावर, पाठीवर मारहाण केली.

आरोपी कुणाल याने फिर्यादी यांच्या कपाळावर, खांद्यावर, पायावर लोखंडी रॉडने मारले. यात फिर्यादी जखमी झाले. त्यानंतर कुणाल याने फिर्यादी यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्यादी हे बाजूला  झाले. याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 308, 324, 504, 34 नुसार सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी कुणाल याला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.