Film Review: …काही विसरले गेलेले चित्रपट- इरादा

a film review of irada movie written by harshal alpe कुठलाही वास्तववादी चित्रपट साकारायला अभिनयाची साथ अगदी भक्कम लागते आणि या चित्रपटात तर त्याची पर्वणीच आहे.

एमपीसी न्यूज- कधी कधी चित्रपट हे माध्यम खूपच प्रभावीरित्या मांडता येऊ शकतं. एखाद्या जागतिक समस्येवर भाष्य ही केलं जाऊ शकतं. काही वेळा त्यावर तोडगा ही याच चित्रपटात लपलेला असतो. मुळात चित्रपट हे माध्यम फक्त मनोरंजनापुरते न राहता त्यातून बरेच काही सांगता येते.

असाच एक चित्रपट नुकताच सोशल मीडियावर पाहण्यात आला, जो खरं म्हणजे चित्रपटांच्या गर्दीमध्ये हरवून गेला. अन् तरी ही त्याच्यातील नाविन्य हे जास्त आपलसं वाटलं.

खरं तर कारखान्यांमुळे आणि त्यातील केमिकल्समुळे नद्या प्रदूषित होणं हे काही आपल्याला नवीन नाही. आजूबाजूच्या नद्यांवर नजर टाकली तरी आपल्या लक्षात येतं. पण त्याच्या होणार्‍या गंभीर परिणामांचा आपण कधी विचारच केलेला नसतो. उद्योग महत्वाचेच असतात. पण पर्यावरणाचा आणि आरोग्याची काळजी घेऊन केलेला विकास, याचा कुणी विचार करतं का ? आणि त्या नंतर त्या केमिकल्समुळे, सांडपाण्यामुळे समाजाचं एकत्रित आरोग्य बिघडलं तर त्याला जबाबदार कोण ? हाच मूळ प्रश्न या सिनेमाचा पाया आहे.

या चित्रपटाची पार्श्वभूमी जरी पंजाबमधील एका प्रत्यक्ष घटनेवरून घेतलेली असली तरी ती आपल्या सगळ्यांनाच लागू आहे.

या चित्रपटाला त्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि तो ही पर्यावरणावर मिळाला आहे, ही विशेष बाब.

हा चित्रपट अपर्णा सिंह आणि अनुष्का राजन यांनी लिहिलेला आहे. तर याचे दिग्दर्शन अपर्णा सिंह यांनीच केलेले आहे. तर रवी वालिया यांनी हा चित्रपट अत्यंत सफाईदारपणे चित्रित केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

कुठलाही वास्तववादी चित्रपट साकारायला अभिनयाची साथ अगदी भक्कम लागते आणि या चित्रपटात तर त्याची पर्वणीच आहे. या चित्रपटाचा केंद्रबिंदू नसीरुद्दीन शाह यांनी साकारलेला निवृत्त सैनिक अधिकारी परबजित वालिया आपल्या मुलीच्या दुर्धर आजाराने हतबलतेकडे चाललेल्या अन् तरीही परिस्थितिशी मुकाबला करण्याचं सामर्थ्य असलेल्या बापाची गोष्ट भूमिकेशी एकरूप होऊन त्यांनी साकारलेली आहे.

तसेच अभिनेता अर्शद वारसी याने या सगळ्या गुन्ह्याचा तपास अधिकारी अर्जुन मिश्रा वेगळ्याच शैलीत साकारलेला आहे. तर धूर्त राजकारणी म्हणून दिव्या दत्ताने कमाल केली आहे. अभिनेता शरद केळकर याची स्वार्थी उद्योजकाची भूमिका राग आणणारी तितकीच प्रभावी झाली आहे. विशेष बाब म्हणजे ‘चक दे’ गर्ल सागरिका घाटगेने पत्रकाराची भूमिका खूपच सुंदर वठवली आहे.

एक गुन्हा लपवण्यासाठी दूसरा गुन्हा त्यातून सुरू होणारी गुन्ह्यांची मालिका यात पुन्हा एकेक धागा पकडत केला गेलेला तपास हे सर्वच खूपच वास्तवदर्शी आहे. विशेष बाब म्हणजे ज्यावेळी अर्शद वारसी एका टप्प्यावर तपासावेळी कॅन्सर स्पेशल ट्रेन मध्ये चढतो. त्यावेळी समाजात पसरत जाणाऱ्या या रोगाची परिणामकारकता पाहून जसा त्याचा थरकाप उडालेला आहे. तसाच आपला ही होतो.

नद्या, शेतजमीन, शेती, अन्न यात जर कंपन्यांमधील सांडपाणी केमिकल गेले तर किती भयानक परिणामांना सामोरं जावे लागते याची पूर्व कल्पनाच म्हणजे हा चित्रपट आहे. अशावेळी त्याचा खात्मा करण्यासाठी जर का कोणी हिंसक पाऊल उचललं तर झालेल्या हिंसेला जबाबदार कोण ? हा मूलभूत प्रश्न ही चित्रपट उपस्थित करतो.

एकदा जरूर पाहावा असा हा चित्रपट आहे. हा चित्रपट युट्यूबवर विनामूल्य उपलब्ध आहे.

– लेखक : हर्षल आल्पे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.