Pune: मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून 72 हजारांचा दंड वसूल

A fine of Rs. 72,000 recovered from persons not wearing masks in public places.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात मास्क घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. अन्यथा 500 रुपये दंड किंवा पोलीस कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. त्यानुसार आतापर्यंत 144 नागरिकांकडून 72 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

पुणे शहरात  कोरोनाचे रुग्ण 18 हजारांच्या आसपास गेले आहेत. हे संकट आटोक्यात आणण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना करीत आहे. अधिकारी – कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहे.

मात्र, अद्यापही काही नागरिकांना कोरोनाचे पाहिजे त्या प्रमाणात गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या संकट काळात मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.

सार्वजनिक ठिकाणी, खाजगी, सरकारी कार्यालयात मास्क घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच, गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यांवर थुंकणाऱ्यां विरोधात कारवाई थंडावली होती.

त्याला आता गती देऊन ही कारवाई सुद्धा करण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.

तर, पुणे महापालिका वारंवार आवाहन करूनही भागातील नागरिक मास्क घालत नसल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येत आहे. आशा नागरिकांवर आगामी काळात धडक कारवाई करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायजर लावणे, वारंवार हात धुणे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.