Mulashi : मारुंजी रोड येथील मेमाणे वस्तीजवळ टायर व प्लास्टिकच्या गोडाउनला आग

एमपीसी न्यूज – मुळशीतील मारुंजी रोड येथील मेमाणे वस्तीजवळ टायर व प्लास्टिकच्या गोडाउनला आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोठी आग लागली होती. पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाच्या 3 गाड्यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

कात्रज येथील एका व्यक्तीचे (अद्याप नाव कळले नाही) मारुंजी रोड येथे टायर व प्लास्टिकचे गोडाउन होते. येथे आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक आग लागली. आसपास मोकळे फ्लॉट असल्याने तसेच वस्ती नसल्याने आग लागल्याचे लवकर समजले नाही. मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे नागरिकांनी पाहिल्यानंतर त्यांनी एमआयडीसी फेज वन येथील अग्निशामक दलाला यासंबंधी माहिती दिली. पीएमआरडीएच्या हद्दीत असल्याने त्यांनी याची माहिती पीएमआरडीएच्या विभागाला कळविली. मात्र, आतमध्ये सर्व टायर आणि प्लास्टिकचे तुकडे असल्याने आगीने अल्पावधीत पेट घेऊन रौद्ररूप धारण केले. यामध्ये संपूर्ण गोडाउन जळून खाक झाले.

दरम्यान पीएमआरडीएच्या 3 गाड्या आणि 25 जवानांनी 40 हजार लिटर पाण्याचा मारा करीत ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गोडाउन मालक नसल्याने एकूण किती माल जळाला हे समजले नाही. या कामगिरीत मारुंजी उपस्थानक अधिकारी विजय महाजन यांच्यासह 25 जवानांनी बजावली.

मुळशी, मारुंजी रोड येथील मेमाणे वस्तीजवळ टायर व प्लॅस्टिक असणाऱ्या गोडाऊनला आग; पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या 3 फायरगाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.