Chikhali News : बस स्थानकावरील बाकावर बसल्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – चिखली परिसरातील एका बस थांब्यावरील बाकावर बसल्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानाचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. 27) सायंकाळी हा प्रकार घडला. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. प्रदीप जनार्दन कांबळे (वय 57, रा. धनकवडी), असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिखली येथील अग्निशामक उपकेंद्रात कांबळे हे कार्यरत होते. सध्या ते चिखली येथे भाडेतत्वावरील खोलीत राहत होते. शनिवारी ते चिखली येथील राजे शिवाजीनगर येथे बस थांब्याजवळील एका बाकावर बसले. ते बसलेल्या अवस्थेत एका नागरिकाच्या निदर्शनास आले.

कांबळे यांचा मोबाईल बाका जवळच खाली पडला होता. त्यामुळे संशय आल्याने त्या नागरिकाने कांबळे यांच्या फोनवरून अग्निशामक केंद्रातील एका जवानाला माहिती दिली. त्या जवानाने पोलिसांना माहिती देऊन कांबळे यांना रुग्णवाहिकेतून पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समजू शकेल, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.