Talegaon : दारू पिताना झालेल्या वादातून मित्रांने केला मित्राचा खून

एमपीसी न्यूज – दारू पिताना झालेल्या वादातून तीन मित्रांनी मिळून एका मित्राचा खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 5) रात्री इंदोरी परिसरात घडली आहे.

गुरुदास उर्फ पिल्या सदाशिव तेलंग (वय 27, रा. इंदोरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदोरी येथे कॅडबरी कंपनीच्या समोरून जाणा-या कच्च्या रस्त्यावर मयत गुरदास हा त्याच्या अन्य तीन मित्रांसोबत दारू प्यायला बसला होता. दारू पिताना त्यांच्यामध्ये किरकोळ कारणांवरून वाद झाला. त्यातून तिघांनी मिळून गुरुदासवर चॉपरसारख्या धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केला.

खून केल्यानंतर आरोपी पळून गेले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपींचा माग काढून तिघांना ताब्यात घेतले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.