Pune Crime News : दुसऱ्या व्यक्तीच्या कागदपत्रांवर कर्ज घेऊन नव्या दुचाकी विकत घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

28 दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज : राज्यातील विविध शहरात बनावट कागदपत्रांच्या आधारे दुस-याच्या नावे दुचाकी घेउन फसवणूक करणा-या टोळीला सहकारनगर पोलिसांनी अटक केले आहे. टोळीकडून ३० लाख रूपये किमतीच्या २८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींनी पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नवी मुंबई, मीरा भार्इंदर, वसई, विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट प्रकरण करून दुचाकी लुटल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.

किरणकुमार शशिकांत पेडणेकर (वय ३४, रा. नायगाव, वसई) अनिल नामदेवराव नवथळे (वय ३१, रा. अकोला) , प्रवीण विजय खडकबाण (वय ३९, रा. नायगाव, मुंबई),  देवेंद्रकुमार केशव मांझी (वय ५०, रा. पालघर, मुंबई), भूषण राजेंद्र सुर्वे (वय ३२, रा. धुळे), सुरेश हरिश्चंद्र मोरे (वय ४१, रा. ठाणे), पंकजकुमार राजेंद्रप्रसाद सिंह (वय ३०, रा. ठाणे, मूळ-वापी, गुजरात)  अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रीतेश सुभाष शिंदे (रा. ठाणे, मूळ- उब्रज सातारा) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी प्रीतेश कामानिमित्त पुण्यात आले असताना, त्यांना एका बँकेचे कर्ज मंजूर झाल्याचा मेसेज आला. मात्र, त्यांनी कर्जासाठी अर्ज केला नसल्यामुळे त्यांनी बँकेत फोन केला. त्यानंतर ते बँकेत गेले असता, त्यांच्या नावाचे बनावट आधारकार्ड, मतदानकार्ड, पॅनकार्ड देउन दुचाकी बुक केली होती. त्याला बनावट धनादेशही जोडण्यात आला होता. त्यानुसार प्रीतेश यांनी सहकानगर पोलीस  ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून शोरूममधून दुचाकी घेण्यासाठी आलेल्या किरणकुमारला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने इतर सहा साथीदारांच्या मदतीने राज्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  बँकामध्ये बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे सांगितले. त्यानुसार आरोपींकडून पोलिसांनी २८ दुचाकी जप्त केल्या आहेत. त्याशिवाय बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी आवश्यक लॅपटॉप, प्रिंटर, पेनड्राईव्ह, शिक्के, मोबाईल, मिळून ३० लाखांचा ऐवज जप्त केला आहे. अशाप्रकारे बनावट कागदपत्रांचा आधार घेउन दुचाकी स्वीकारून फसवणूक झालेल्या नागरिकांनी सहकारनगर पोलिस ठाण्याकडे अर्ज करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरूण वायकर यांनी केले आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरूण वायकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस उपनिरीक्षक बापू खेंगरे, बापू खुटवड, विजय मोरे, संदीप जाधव, भुजंग इंगळे, संदीप ननवरे, सतीश चव्हाण, प्रकाश मरगजे, किसन चव्हाण, प्रदीप बेडीस्कर, शिवलाल शिंदे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.