Talegaon Dabhade : मावळात आजपासून पर्यावरणपूरक ‘शुद्धी गणेश’ उपक्रमास प्रारंभ

'एक गणपती, एक झाड' उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – श्रीमंत सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे महिला व बालकल्याण संस्था, श्रीकृष्ण गोशाळा व मावळ प्रबोधिनी यांच्यावतीने ‘एक गणपती, एक झाड’ व पूर्यावरणपूरक ‘शुद्धी गणेश’ उपक्रम आज (शनिवार) दि. 31  ऑगस्ट ते सोमवार दि. 2 सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मावळ तालुका भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष व मावळ प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी दिली.

तळेगाव येथील फन स्क्वेअर सिनेमागृहासमोर आज (शनिवारी) दुपारी चार वाजल्यापासून भाविकांना शुद्धी गणेश मूर्ती विकत मिळू शकतील. 70 टक्के देशी गायींचे शेण, 25 टक्के सुपिक माती, चार टक्के तुरटी व एक टक्का पंचगव्य यांचा वापर करून प्रसाद सिंदगी या युवकाने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविल्या असून या मूर्तींना शुद्धी गणेश असे नाव देण्यात आले आहे. श्रीमंत सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे महिला व बालकल्याण संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात या आकर्षक मूर्ती बनविल्या आहेत. या मूर्ती नागरिकांना केवळ 501 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असून भाविकांनी आपापल्या घरी या शुद्धी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करून शुद्धी गणेश उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन रवींद्र भेगडे यांनी केले आहे.

या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना प्रसाद सिंदगी म्हणाले की, गाईच्या शेणात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशिअम हे घटक असतात. नायट्रोजन पाण्यात नायट्रोजन चक्र वाढवण्यास मदत करतो, तर फॉस्फरस हा विषाणू नष्ट करण्यासाठी तर पोटॅशिअम जलशुध्दीकरणासाठी उपयोगी आहे. तुरटी पाणी स्वच्छ करण्याचे तसेच गाळ तळाशी बसविण्याचे काम करते. शेणातील फायबर मासे व जलचरांसाठी उत्तम खाद्य म्हणून उपयोगी आहे. मूर्ती बनविताना पर्यावरणपूरक रंगाचा वापर करण्यात आला आहे .

शुद्धी गणेश मूर्तीच्या हातात शेण व मातीने तयार केलेला एक मोदक पण दिला जाणार आहे. बीज गोळे अर्थात सीड बॉल प्रमाणे हा बीज मोदक असणार आहे. यामध्ये कडुनिंब, मोहो, जांभूळ, पळस, कांचन, कदंब आदी झाडांच्या बिया आहेत. आपल्या घराजवलील मोकळ्या जागेत आपण हा मोदक जमिनीमध्ये पुरला तर त्यातून एका झाडाचा जन्म होऊ शकतो यासाठी ‘एक गणपती, एक झाड’ हा उपक्रमही राबविण्यात येणार आहे, अशी माहिती रवींद्र भेगडे यांनी दिली.

पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करूया, इको-फ्रेंडली बाप्पाला घरी आणूया, या शब्दांत रवींद्र भेगडे यांनी भाविकांना शुद्धी गणेश उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.