BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : पूरग्रस्तांसाठी मदतीचा मोठा ओघ सुरु; चाकणकरांनी जागवली माणुसकी 

एकाच दिवसात दोन ट्रक साहित्य जमा 

एमपीसी न्यूज – कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले असून या पूरग्रस्त बांधवांना मदत करण्यासाठी खेड तालुक्यातील जनता सरसावली आहे. शनिवारी (दि.१०) चाकण (ता. खेड) येथून तब्बल दोन ट्रक भरतील एवढे कपडे, वस्तू व खाण्याचे साहित्य गोळा करून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासाठी पाठवण्यात आले आहे. याशिवाय फेरी काढून पैसे व साहित्य गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली असून सामन्यातील सामान्य चाकणकरांकडून पूरग्रस्तांना सढळ हाताने होत असलेल्या मदतीचे कौतुक होत आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थितीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक नागरिक बेघर झाले आहेत. लाखो कुटुंब उद्धवस्त झाले आहेत. त्यामुळे चाकणमधून मदतीचा मोठा ओघ शनिवारपासून सुरु करण्यात आला आहे. शनिवारी खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रचंड  प्रतिसाद दिल्याचे चित्र पहावयास मिळाले.
चाकणमध्ये सकाळपासून कार्यकर्ते, युवक आणि अनेक भागांमध्ये महिलांनीही घरोघरी फिरून साहित्य गोळाकरून मदतीसाठी आणून दिले आहे. शहरातील विविध भागातून कपडे व खाद्यपदार्थ एकत्र करून कोल्हापूर व सांगलीसाठी पाठवण्यात येत आहेत. याशिवाय सर्वांनी एकत्र येत शहरातून फेरी काढली. यामध्ये आमदार सुरेश गोरे यांच्यासह रामदास धनवटे, खेड पंचायत समितीचे उपसभापती भगवान पोखरकर, प्रकाश वाडेकर, मनोहर शेवकरी, प्रवीण गोरे आदींसह कार्यकर्ते, चाकणकर नागरिक सहभागी झाले होते.

यावेळी नागरिकांनी वस्तूंसह पैसेही दिले.  दररोज जमा होत होणारे पैसे, खाद्यपदार्थ, वस्तू व कपडे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत प्रशासनाच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली व पूरग्रस्त भागात रवाना करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुरेश गोरे यांनी दिली.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3