Pune News : खळबळजनक! अज्ञाताने केलेल्या गोळीबारात किराणा दुकानदार गंभीर जखमी

एमपीसी न्यूज : पुण्याच्या कात्रज परिसरातील दत्तनगर भागात एका किराणा दुकानदारांवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. या गोळीबारात संबंधित दुकानदार गंभीर जखमी झाला आहे. पंजाबी (वय 36) असे गोळीबारात जखमी झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

या प्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, कात्रज परिसरातील दत्तनगर मध्ये पंजाबी यांचे किराणा सामानाचे मोठे दुकान आहे. रविवारी रात्री ते नेहमीप्रमाणे दुकानात होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये त्यांच्या डोक्याला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हा गोळीबार नेमका कोणी आणि कशासाठी केला याची माहिती मात्र अद्याप होऊ शकले नाही.  काही दिवसांपूर्वीच भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील आंबेगाव बुद्रुक परिसरात अशीच एक गोळीबाराची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर पुन्हा अशी घटना घडल्यानंतर या परिसरात खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.