Pune News : रानगव्यानंतर आता दिसला हरणांचा कळप !

एमपीसी न्यूज : काही दिवसांपुर्वी कोथरुड आणि बावधन भागात रानगवा आढळून आला होता. आता शिवणे येथील आशिर्वाद सोसायटीत हरणाचा कळप मंगळवारी दुपारी दिसून आला आहे. हा कळप दिसल्यानंतर स्थानिकांनी वनविभागाशी संपर्क साधल्यानंतर वनविभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. 

यावेळी एनडीएच्या तुटलेल्या संरक्षण भिंतीची तातडीने दुरुस्ती करावी, असे पत्र वनविभाग आता एनडीए व्यवस्थापनाला देणार आहेत. दरम्यान नागरिक हरणांना गवत खायला घालत होते. आता या हरणांचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

एक महिन्यापुर्वी कोथरुड येथे रानगवा वाट चुकून आला होता. त्यावेळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे गवा घाबरून पळत सुटला. त्याला पकडण्याच्या नादात रानगवा जखमी अवस्थेत पकडल्यानंतर काही तासात तो मृत्यूमुखी पडला. त्यानंतर पुन्हा पाषाण तलावासमोर आणखी एक रानगवा दिसून आला. त्यावेळी तात्काळ वनविभाग व पोलीस दाखल झाले. प्रशासनाने नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे रानगव्याला परत पाठवण्यास वन विभागाला यश आले होते.

आता हरणांचा कळप नागरी वस्तीत दिसला आहे. एनडीएच्या जंगल परिसरालगत मोठ्या प्रमाणावर मानवी वस्ती वाढल्यामुळे संरक्षण भिंतीच्या तुटलेल्या जागेतून वन्यप्राणी रस्ता चुकल्यावर नागरी वस्त्यांमध्ये येत असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.