Pune News : फेसबुकवरील ओळखीतून प्रेमसंबंध अन् वकील महिलेला दीड कोटींचा गंडा

एमपीसी न्यूज : पुण्यातील एका 45 वर्षीय वकील महिलेसोबत फेसबुकवर ओळख झाल्यानंतर प्रेमसंबंधाचे  नाटक करत तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. एका कंपनीचा संचालक असल्याचे भासवून या महिलेला हा गंडा घालण्यात आला. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात टोनी थॉमस याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2017 ते 2022 हा प्रकार घडला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या वकील आहेत. पुण्यातील औंध परिसरात त्या राहतात. आरोपी आणि फिर्यादीची एका क्लबमध्ये ओळख झाली होती. त्यानंतर 2016 साली आरोपीने या महिलेला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर आरोपीने फेसबुक वर मेसेज करून बाणेर मधील ऑफिसमध्ये या महिलेला भेटायला बोलावले.

या भेटीत त्याने सिंद्रिया बिझनेस सोल्युशन नावाची कंपनी सुरू केल्याचे सांगितले. या कंपनीकडून क्लिअर इस्टेट नावाचा प्रकल्प केला जात असून त्यात गुंतवणूक करण्यास फिर्यादीला भाग पाडले. फिर्यादीने यानंतर 1 कोटी 62 लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर काही काळाने त्यांच्यात वाद झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे या फिर्यादी महिलेच्या लक्षात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.