Hinjawadi : शिवीगाळ केल्याच्या रागातून जिवाभावाच्या मित्राचा दगडाने ठेचून खून

एमपीसी न्यूज – दारू पिल्यानंतर दोन मित्रांनी एकमेकांना शिवीगाळ केली. एकाने दुस-या मित्राला शाब्दिक वादात भाईगिरीची भाषा वापरली. यावरून मित्राने भाईगिरीची भाषा वापरणा-या मित्राला निर्जन ठिकाणी नेले आणि दगडाने ठेचून खून केला. ही घटना सोमवारी (दि. 28) रात्री हिंजवडीमधील आल्दीया इस्पानोला सोसायटीच्या मागच्या बाजूला घडली. या घटनेतील आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी चोवीस तासात अटक केली.

राजेश सुरेश राऊत (वय 34, रा. महाळुंगे, ता. मुळशी) असे खून झालेल्या मित्राचे नाव आहे. त्याची पत्नी प्रिती राजेश राऊत यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सुधीर ओमपाल दुगलचे (वय 37, रा. काशीद पार्क, पिंपळे गुरव, सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री महाळुंगे गावातील आल्दीया इस्पानोला सोसायटीच्या मागच्या बाजूला खुनाचा प्रकार उघडकीस आला. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हिंजवडी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट एक यांनी या प्रकरणाचा समांतर तपास सुरु केला. गुन्हे शाखेने खून झालेल्या व्यक्तीची माहिती मागवली असता तो सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. चतुःशृंगी पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत.

मिळालेल्या माहितीवरून तपास करत असताना, राजेश मंगळवारी त्याच्या एका मित्रासोबत पाषाण येथील लमानतांडा येथे दारू पिण्यासाठी गेल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार, परिसरात चौकशी आणि तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तपास केला असता आरोपी सुधीर त्याच्यासोबत असल्याचे समोर आले. सुधीर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली.

_MPC_DIR_MPU_II

मयत राजेश आणि आरोपी सुधीर हे एकमेकांचे जिवाभावाचे मित्र होते. सोमवारी ते दोघेजण चतुःशृंगी पायथा आणि पाषाण लमानतांडा येथे दारू पिऊन दिवसभर एकाच मोटारसायकलवरून फिरत होते. रात्री आठच्या सुमारास बाणेर रोडवरून घरी जात असताना दोघांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. त्यामध्ये राजेश याने सुधीर याला भाईगिरीची भाषा वापरली. त्यामुळे सुधीर याने राजेशच्या तोंडावर मारले. त्यानंतर दोघांमध्ये समझोता होऊन पुन्हा एकमेकांसोबत घरी जाऊ लागले.

घरी जात असताना दोघांमध्ये झालेल्या भांडणाचा राग सुधीर याच्या मनात होता. त्याने राजेश याला मोटारसायकलवरून महाळुंगे गावातील आल्दीया इस्पानोला सोसायटीच्या मागच्या बाजूला निर्जन ठिकाणी नेले. तिथे राजेश याच्या डोक्यात दगड मारून त्याचा निर्घृणपणे खून केला.

मयत राजेश आणि आरोपी सुधीर हे दोघेही चतुःशृंगी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. 2013 साली चतुःशृंगी पोलिसांनी दोघांकडून सहा गावठी पिस्टल जप्त केल्या होत्या. तर 2015 मध्ये प्रेम प्रकरणाच्या संशयावरून पाषाण येथे राहणा-या राकेश कदम याचा खून केला होता. त्यात दोघेही दोन वर्ष तुरुंगात होते.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी रवींद्र राठोड, शिवाजी कानडे, अमित गायकवाड, प्रमोद लांडे, विजय मोरे, प्रवीण पाटील, गणेश सावंत, मारुती जायभाये, प्रमोद गर्जे, तानाजी पानसरे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.