Pimpri : कोवळ्या वयातच हरवणारं बालपण

एमपीसी न्यूज – दहा बारा वर्षांची होईपर्यंत मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं जातं. कारण कोवळ्या वयात त्यांना कोणत्याही संकटांचा सामना करावा लागू नये. या वयात मुलं फार हळवी आणि दिशाहीन असतात. वयाच्या 14 वर्षापर्यंत कोणत्याही ठिकाणी मुलांना कामाला ठेवता येणार नसल्याचा कायदा आहे. व्यावसायिक ठिकाणे वगळता काही ठिकाणी त्याच वयातील मुलांकडून लहान मोठी प्रलोभने दाखवून काम करून घेतले जाते. यामुळे कोवळ्या वयातील मुलांचं बालपण अगदी सहज हरवून जातं.

थेरगाव येथे राहणा-या नीरजा माने यांच्यासमोर एक प्रसंग घडला. नवरात्रीचे दिवस होते. नीरजा रस्त्याने जात होत्या. थेरगाव मधील एका रस्त्याच्या कोप-यावर एक चार-पाच वर्षांची मुलगी दाराला तोरणे बांधण्यासाठी वापरली जाणारी आंब्यांची पाने विकताना दिसली. तिच्याजवळ जबाबदार व्यक्ती कोणीही नव्हती. एकटी चिमुकली आंब्यांची पाने विकत होती. उन्हाचा कडाका वाढलेला होता. अंगाची लाहीलाही होत होती. नीरजा यांनी पाने विकणा-या मुलीजवळ जाऊन चौकशी केली. पाने विकणा-या मुलीची सायकल खराब झाली होती. सायकल दुरुस्त करण्याची तिने घरच्यांकडे मागणी केली. मात्र, घरच्यांनी तिची मागणी काही दिवस फेटाळून लावली. वडील दारू पितात, तर आई घरकामात व्यस्त असते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक चणचण भासते. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी तिला आंब्याची पाने विकायला लावले. पाने विकून येणा-या पैशातून तिची सायकल दुरुस्त करण्याचे प्रलोभन दाखवले. सायकल दुरुस्त होणार असल्याच्या आनंदात ती पाने विकायला तयार झाली.

फूटपाथवर एकटी बसून पाने विकू लागली. ही बाब नीरजा यांच्या निदर्शनास आली. त्यांनी मुलीची चौकशी केली. तिचे वडील तिला मागील काही दिवसांपासून सायकल दुरुस्त करण्याचे प्रलोभन दाखवून पाने विकायला लावत होते. वडील दारू पीत तर आई घरकामात व्यस्त असल्याने पाने विकणा-या मुलीकडे त्यांचे दुर्लक्ष होत असे. एका बाजूला नवरात्रीमध्ये ‘ती’च्या नऊ रूपांची, शक्तींची पूजा करायची आणि दुस-या बाजूला कोवळ्या मुलीला काम करायला लावायचे, हे दुर्दैव आहे. नीरजा यांनी पोलिसांना बोलावून मुलीच्या आई-वडिलांना समजावले. सचिन पवार या गृहस्थांनी मुलीची सायकल दुरुस्त करण्यासाठी पैसे दिले आणि तिची सायकल दुरुस्त करून दिली.

कार्ला येथे एकविरा देवीच्या गडावर मागील काही महिन्यांपूर्वी बांधकाम सुरु होते. बांधकामासाठी लागणारे साहित्य गडाच्या पायथ्याजवळ पडले होते. ते साहित्य गडावर नेण्याचे काही लोकांना काम दिले होते. साहित्य गडावर नेण्याचे काम घेतलेल्या व्यक्तीने लहान लहान मुलांना कामाला लावले. एक वीट गडावर नेण्यासाठी दहा रुपये मिळत. त्यामुळे लहान मुलांनी देखील या कामासाठी संमती दर्शवली. एक चिमुकला किमान तीन ते चार विटा एका वेळेला वर न्यायचा. एका फेरीत त्याला चाळीस रुपये मिळत होते. खुळखुळणा-या पैशांमुळे त्यांचं बालपण हिरावत जातंय हे त्यांच्या मनातही येत नसेल.

कंपनी, कारखान्यात मुलांना वयाच्या 14 वर्षापर्यंत काम करू न देण्याचा कायदा निघाला. पण या अल्पवयीन कामगारांचं काय? हा प्रश्न सध्या आहे. लहान वयात मुलांनी काम केले तर त्यांना सोडवणूक होते. पण त्यात त्यांचं बालपण भरडून जातं. लहान वयातच पैसे कमावण्याची सवय लागते. लिहिण्या-वाचण्याच्या वयात हाताला काम मिळाले तर कालांतराने त्या हातात पुस्तके रमत नाहीत. ही मुले कालांतराने शाळाबाह्य होतात. शाळाबाह्य मुलांना पुन्हा शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करते, पण तेही तोकडेच पडतात. अशा मुलांकडे समाजाने उघड्या डोळ्याने पाहायची आणि कृती करण्याची गरज आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.