Chinchwad News : 22 वर्षांच्या मुलीच्या शरीरातून काढली 11.2 किलो वजनाची गाठ, आई होण्याची शक्यता अबाधित

एमपीसी न्यूज – 22 वर्षीय अविवाहित तरुणीच्या डिंबग्रंथींमधून 11.2 किलो वजनाचा मोठा कर्की (कॅन्सरस) भाग काढला आणि तिची प्रजननक्षमता व आई होण्याची शक्यता अबाधित ठेवली. आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, चिंचवड येथे ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. गुंतागुुंतची हि शस्त्रक्रिया तीन तास सुरू होती.

पुण्यातील लष्करी कुटुंबातील या तरुणीचे लॉकडाऊनच्या दरम्यान वजन खूप वाढू लागले. सुरवातीला त्यांनी लोहगाव येथील जनरल फिजिशिअनचा सल्ला घेतला, त्यावर डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. सोनोग्राफीमध्ये 45 सेमी आकाराचा डिंबग्रंथी मांसल भाग दिसून आला. लगेचच तिला आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सिंग यांना भेटण्यास सांगितले.

‘हा मांसल भाग इतका मोठा होता की, त्याची वरची कडा रुग्णाच्या स्तनांना लागत होती.’, असे डॉ. सिंग यांनी सांगितले. हा मांसल भाग अघातक नसावा, अशी शंका डॉक्टरांना आल्यामुळे त्यांनी लगेचच या रुग्णाला गायनेक ऑन्को सर्जन डॉ. निखिल एस. पर्वते यांची भेट घेण्यास सांगितले. शस्त्रक्रिया आवश्यक होती.

शस्त्रक्रियेच्या दोन निष्पत्ती असू शकत होत्या. एक म्हणजे तो मांसल भाग अघातक होता आणि कोणत्याही गुंतागुंतीशिवाय तो काढून टाकता आला असता. पण जर तो भाग घातक असता तर कर्करोग कोणत्या टप्प्यावर आहे, ते आधी तपासून घ्यावे लागले असते आणि त्यानुसार तिची प्रजननक्षमता राखता येईल किंवा नाही, याचा निर्णय घेता आला असता.’ असे डॉ. निखिल एस. पर्वते म्हणाले.

‘सामान्य स्थितीत स्टेज 1ए – ग्रेड 2 या कर्करोग टप्प्यापर्यंत तुम्हाला प्रजननक्षमता अबाधित ठेवता येते, अशी पुष्टी त्यांनी जोडली.ही केस किचकट आणि दुर्मीळ होती. तो मांसल भाग पूर्णपणे काढून टाकणे हे आमच्या समोरील पहिले मोठे आव्हान होते. हा मांसल भाग न फाडता काढून टाकायचा होता, कारण तो संपूर्ण पोटात कर्करोग पसरवू शकत होता. परिणामी कर्करोग वाढू शकला असता आणि त्यामुळे मृत्यू होऊ शकत होता. त्यामुळे 11.2 किलो वजनाचा हा मांसल भाग न फाटता काढणे अत्यंत आव्हानात्मक होते. तो काढल्यानंतर जसा होता तसा पॅथोलॉजिस्टना देण्यात आला. याला फ्रोझन सेक्शन असे म्हणतात. हा भाग अघातक होता की घातक होता याचे निदान करायचे होते, जेणेकरून शस्त्रक्रियेविषयी पुढील निर्णय घेता येईल.’, असे डॉ. निखिल एस. पर्वते यांनी सांगितले.

पॅथोलॉजिस्टनी सांगितले की, या गोळ्यामध्ये मायक्रो-इन्व्हेसिव्ह कॅन्सरचे काही भाग होते, त्यामुळे तो स्टेज 1ए टप्प्यावरील कर्करोग होता, असे निदान करण्यात आले. ही परिस्थिती समजल्यावर ऑन्को-सर्जनने लगेचच मेडिकल ऑन्कोलॉजिस्टशी संपर्क साधला. त्यांना ही पूर्ण परिस्थिती माहीत होती आणि याबद्दल चर्चा केल्यानंतर या तरुणीची प्रजननक्षमता कायम राखता येईल, असा निर्णय एकत्रितपणे घेण्यात आला.

लगेचच फर्टिलिटी स्पॅरिंग ऑन्को सर्जरी केली, ज्यात गर्भाशय आणि डिंबग्रंथी राखण्यात आल्या आणि कर्करोगाची व्याप्ती जेवढी होती तो मार्ग आणि गर्भाशय व डिंबग्रंथीभोवतीच्या ऊती काढण्यात आल्या. डॉ. रणजीत यांनी दिलेला सुयोग्य जनरल अनेस्थेशिया आणि डॉ. सीमा सिन्हा यांनी फ्रोझन व फायनल हिस्टोपॅथॉलॉजीचे बारकाव्यांसकट रिपोर्टिंग केल्याने संपूर्ण टीमच्या मदतीने ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.”, असे डॉ. निखिल एस. पर्वते यांनी सांगितले.

ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया 3 तास 15 मिनिटे चालली, ज्यात ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज लागली नाही आणि रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवावे लागले नाही. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.