Pune News : पुण्यात भीषण अपघात, आईसह मुलीचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज : रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून बोलत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात आईसह मुलीचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रविवारी झाला. जिजाबाई केरूभाऊ पळसकर (वय 52), ताराबाई महादू साबळे (वय 73) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर विलास महादू साबळे (वय 47) हे गंभीर जखमी झाले आहेत. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी, जखमी विलास साबळे आणि त्यांची आई ताराबाई साबळे हे टाकळी हाजी येथून दुचाकीने जात होते. त्यावेळी रस्त्याने त्यांना त्यांची बहीण जिजाबाई पळसकर या पायी जाताना दिसल्या. त्यामुळे विलास यांनी रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी केली आणि ताराबाई आणि जिजाबाई या दोघी मायलेकी रस्त्याच्या कडेला बोलत थांबल्या होत्या. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या ट्रकने तिघांनाही धडक दिली.

या गंभीर अपघातात ताराबाई यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. तर जिजाबाई गंभीर जखमी झाल्या होत्या. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच जिजाबाई यांचा देखील मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.