Bhosari : वात्सल्य मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटलच्या वात्सल्यामुळे चिमुकल्याला मिळाले जीवनदान

A mother & child care hospital helps recover an one day old abandoned infant.

एमपीसी न्यूज – रविवारी (दि. 17) दुपारच्या सुमारास मोशी बोऱ्हाडेवस्ती येथील कचराकुंडीत बाळाच्या रडण्याचा आवाजाने, मानवतेस काळिमा फासणारी घटना समोर आली. एका बाळाला नाळ व वारे सकट प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून कचरा कुंडीत फेकण्यात आले होते. याबाबत नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांनी वात्सल्य हॉस्पिटलचे डायरेक्टर व प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर रोहिदास आल्हाट यांच्या सोबत मोबाईलवर चर्चा करून लगेच वात्सल्य हॉस्पिटलमध्ये आणले. यामुळे त्या बाळाला जीवनदान मिळाले आहे.

बाळाची नाळ अजूनही वारेला जुडली होती. हॉस्पिटल मध्ये आल्यावर बाळाची अवस्था अत्यंत गंभीर होती. बाळ पूर्णपणे थंड पडले होते. त्यास श्वास घेण्यास त्रास होत होता, बाळाचा रक्तदाब खूप कमी झाला होता. बाळास जंतुसंसर्ग लागला असण्याची शक्यताही होती.

हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर बाळाला गरम करण्यात आले. ऑक्सिजन दिल्यानंतरही श्वास घेण्यास त्रास होतच होता म्हणून व्हेंटिलेटरची गरज भासली.

रक्तदाब व्यवस्थित ठेवण्यासाठी Inotropic औषधे देण्यात आली. जंतुसंसर्ग बरा होण्यासाठी व टाळण्यासाठी antibiotic सुरु करण्यात आले. बाळानेही नवजात शिशु तज्ञ डॉ. दुर्गाप्रसाद मराठे यांच्या उपचारास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

हळूहळू बाळाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. शुक्रवारी (दि. 21) बाळाला दूध सुरु करून ते वाढवले जात आहे. बाळास व्हेंटिलेटर वरून आता ऑक्सिजनची गरज लागत आहे.

रक्तदाबासाठी लागणारी औषधे बंद करण्यात आली आहेत. बाळाच्या हृदयामध्ये 7 मिलिमीटरचे छिद्र असल्याचे (ASD) आढळून आले आहे.

बाळाची सध्याची प्रकृती स्थिर असून त्यात सुधारणा होत आहे. बाळासाठी लागणारा सर्व खर्च औषधांचा, तपासणीचा व दवाखान्याचा सर्व खर्च वात्सल्य मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटल करत आहे.

बाळाची सुधारणा पाहून आम्हास आनंद होत आहे असे हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. संदीप कवडे, (बालरोग तज्ञ) डॉ. शंकर गोरे (बालरोग तज्ञ) व डॉ. रोहिदास आल्हाट (स्त्रीरोग तज्ञ) यांनी सांगितले आहे.

बाळाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर व बाळास हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केल्यानंतर बाळास Orphan Home / CWC मध्ये पाठवले जाईल असे पोलीस उपनिरीक्षक अमरदीप कृष्णा पुजारी यांनी सांगितले.

बाळाला या कठीण प्रसंगास सामोरे जाण्यास भाग पाडणाऱ्या पालकांचा तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.