New Song by Arya Ambekar: तरुणाईच्या काळजाला भिडणारं नवं गाणं ‘आठवणी तुझ्या’!

एमपीसी न्यूज – अमित साळुंके याने दिग्दर्शन केलेले आणि आर्या आंबेकर हिने आवाज दिलेले ‘आठवणी तुझ्या’ हे गाणे सर्वत्र प्रदर्शित झाले आहे. या संगीत व्हिडिओमध्ये स्वत: अमित साळुंके व नवोदित अभिनेत्री ऋतुजा राखोंडे यांनी भूमिका केल्या आहेत. सुमित बालिघाटे आणि विवेक पाटील यांनी या गाण्याचे बोल लिहले आहेत. संगीत दिग्दर्शन विवेक पाटील यांनी केले आहे. तरुणाईच्या काळजाला भिडणाऱ्या या नव्या गाण्याला अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

‘आठवणी तुझ्या’ हे गाणे आजच्या तरुण पिढीची मानसिकता दर्शवणारे असे भावनिक गाणे आहे. आठवणींचा त्रास नक्की कसा होतो हे दर्शवणारे आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाच्या आठवणी जागे करणारे हे एक सुंदर गाणे आहे. आठवणींच्या विळख्यात तरूण पिढी कशी अडकते, त्याचा त्यांच्या वागण्यावर काय परिणाम होत असतो आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी ही पिढी काय पाऊल उचलते, या आशयाचे हे भावनिक गाणे आहे.

मनुष्य हा आठवणींमध्ये रमणारा प्राणी आहे. परंतु आठवणींच्या भोव-यात अडकल्यावर त्याचा निश्चितच काहीतरी परिणाम आपल्यावर होतो. या विविध आठवणी आपल्यावर शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या परिणाम करत असतात. आठवणींमध्ये अडकलेल्या मनुष्याची मानसिक व्यथा जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे गाणे पाहावे लागेल.

युट्यूबवर 24 तासांच्या आत या गाण्याला 1 लाख 30 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ॲमेझॉन म्युझिक, ॲपल म्युझिक, युट्युब, स्पॉटिफाय, सावन यां माध्यमांवर प्रदर्शित झाले आहे.

या गाण्यातील हिरो म्हणजेच अमित साळुंके याने यापूर्वी ठाकरे सिनेमात छोटी भूमिका साकारली असून, पुण्यात रंगमंचावर तसेच वेब सिरीजमध्ये काम करण्याचा त्याला अनुभव आहे. गाण्यातील महिला कलाकार ऋतुजा राखोंडे हिने या गाण्याच्या निमित्ताने पदार्पण केले आहे.

आर्या आंबेकर हिलाच आम्हाला आधीपासून गाण्यासाठी घ्यायचे होते. अत्यंत कमी वेळात तिने आम्हाला चांगले आऊटपुट दिले आहे. खरंतर आमच्या अपेक्षेपेक्षा तिने खूप जास्त चांगले आऊटपुट आम्हाला दिले. इतकचं नव्हे तर आर्यानी गाण्यासाठी कधी तयारी, प्रॅक्टीस केली हेदेखील आम्हाला कळले नाही. तिच्याबरोबर रेकॉर्डिंग करण्याचा खूपच चांगला अनुभव आम्हाला आला. अत्यंत कमी वेळेत आर्यानी गाणे रेकॉर्ड केले असल्याचे, अमित साळुंके याने एमपीसी न्यूजला सांगितले.

या गाण्याबद्दल बोलताना अमित म्हणाला, “आधीपासूनच मला सिनेमाशी संबंधित काहीतरी काम करायचे होते. पण बजेटअभावी फिल्मस करता आल्या नाहीत. यांतून व्हिडिओ साँग करण्याचा पर्याय माझ्यासमोर आला आणि आज ही सुंदर अशा गाण्याची कलाकृती लोकांसमोर उभी राहिली आहे.

विवेक पाटील आणि आकाश जाधव यांनी मला हे गाणं दिलं आणि त्यावर आपण काम करू शकतो, असं आमचं ठरलं. पण कोरोना लॉकडाऊनमुळे गाण्याचे निर्माते निघून घेल्यामुळे आम्ही हे गाणं कमी बजेटमध्ये करायचे ठरवले.”

MAS पिक्चर्सने या गाण्याची निर्मिती केली असून या गाण्याचे शूटींग हे पुणे, पानशेत धरण, काशिद बीच, लातूर या ठिकाणी झाले आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळे हे गाणं शूट करायला तीन महिने लागले आणि हा प्रकल्प पूर्ण व्हायला सहा महिने लागले. लॉकडाऊनमुळे या प्रक्रियेला जास्त वेळ लागला. पण अल्पावधीतच आमच्या गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला असल्याने पुढेदेखील काही गाणी करायचा आमचा विचार आहे. तसेच एक ते दीड वर्षानंतर सिनेमांकडे वळण्याचा आम्ही विचार करू, असे अमित साळुंके याने एमपीसी न्यूजला सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.