Sangavi news: वाहतूक कोंडी सुटणार, औध – सांगवी रस्त्यावर मुळा नदीवर 22 मीटर रूंदीचा समांतर पुल बांधणार

पिंपरी महापालिकेने पुणे महापालिकेला दिले 20 कोटी

एमपीसी न्यूज – औध – सांगवी रस्त्यावरील मुळा नदीवर अस्तित्वातील 8 मीटर रूंदीच्या पुलाशेजारी वाढीव 22 मीटर रूंदीचा समांतर पुल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामाचा खर्च पुणे आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेमार्फत 50-50 टक्के विभागून करण्यात येणार आहे. त्यानुसार 50 टक्के म्हणजेच 9 कोटी 9 लाख रूपये आणि पिंपरी बाजूचा अप्रोच रस्ता कल्वहर्ट आणि संरक्षण खात्याच्या जागेत संरक्षण भिंत बांधण्यासाठी येणारा 10 कोटी 96 लाख रूपये खर्च असे 20 कोटी रूपये पिंपरी – चिंचवड महापालिकेने पुणे महापालिकेला दिले आहेत. 

औध – सांगवी रस्त्यावरील मुळा नदीवर अस्तित्वातील 8 मीटर रूंदीच्या पुलाशेजारी वाढीव 22 मीटर रूंदीचा पुल बांधण्याची कार्यवाही पुणे महापालिकेमार्फत सुरू आहे. या नवीन विस्तारीत पुलाला पिंपरी – चिंचवड शहराला जोडण्यासाठी 103 मीटर लांबीचा अप्रोच रस्ता तयार करणे, अस्तित्वातील कल्वहर्ट आणि संरक्षण खात्याच्या जागेत संरक्षण भिंत बांधणे ही पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या अखत्यारीतील कामे पुणे महापालिकेमार्फत केली जावीत आणि त्यासाठी येणारा खर्च पिंपरी महापालिका देईल, असे चर्चेत ठरले आहे.

त्याअनुषंगाने पुणे महापालिकेमार्फत पुर्वगणन पत्रकामध्ये या बाबी समाविष्ट करून संपूर्ण कामासाठी 29 कोटी 14 लाख रूपये इतका खर्च अपेक्षित आहे. पुलाच्या अप्रोचच्या पुढे पिंपरी – चिंचवड भागातील मुख्य रस्ता जोडण्यासाठीच्या रस्त्याच्या कामास 10 कोटी इतका खर्च येत आहे. पुलाशेजारी नवीन पुल बांधण्यासाठीचा खर्च 18 कोटी 18 लाख रूपये आहे. यापैकी 50 टक्के खर्च दोन्ही महापालिकांनी देण्याचे ठरले आहे. त्यानुसार,50 टक्के म्हणजेच 9 कोटी 9 लाख रूपये आणि पिंपरी – चिंचवड बाजूचा अप्रोच रस्ता कल्वहर्ट आणि संरक्षण खात्याच्या जागेत संरक्षण भिंत बांधण्यासाठी येणारा खर्च 10 कोटी 96 लाख रूपये अशा एकूण 20 कोटी 5 लाख रूपयांची मागणी पुणे महापालिकेने केली होती.

पुणे आणि पिंपरी – चिंचवड हद्दीवरील मुळा आणि पवना नदीवरील पुल बांधताना दोन्ही महापालिकांनी 50-50 टक्के खर्च विभागून घ्यावयाचा आहे. तसेच नदीवर बांधायच्या नवीन पुलासाठी एका पुलाचे काम पुणे महापालिका आणि दुस-या पुलाचे काम पिंपरी महापालिकेने करायचे असे ठरले आहे. त्या अनुषंगाने कस्पटे वस्ती येथील मुळा नदीवरील पुलाचे काम पुणे महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. त्याचा 50 टक्के खर्च पुणे महापालिकेने पिंपरी महापालिकेकडे जमा केला आहे. तसेच नदीवरील पुलाचे बांधकाम करताना महापालिका क्षेत्रातील पुलाच्या अनुषंगाने करण्यात येणारा अतिरिक्त बांधकामाचा पुर्ण खर्च निविदा काढणा-या अथवा पुलाचे बांधकाम करणा-या महापालिकेस द्यावयाचा आहे. त्यानुसार, सांगवी फाट्याजवळील अस्तित्वातील 8 मीटर रूंदीच्या पुलाला समांतर वाढीव 22 मीटर रूंदीचा पुल बांधण्यासाठी पुणे महापालिकेस त्याच धर्तीवर 9 कोटी 9 लाख रूपये अधिक 10 कोटी 96 लाख रूपये असे एकूण 20 कोटी रूपये दिले आहेत.

याबाबत बोलताना पिंपरी महापालिकेचे उपअभियंता, प्रवक्ते विजय भोजने म्हणाले, “मुळा नदीवर अस्तित्वातील 8 मीटर रूंदीच्या पुलाशेजारी वाढीव 22 मीटर रूंदीचा समांतर पुल बांधण्यात येणार आहे. कामाचा खर्च पुणे आणि पिंपरी पालिका मिळून करत आहेत. पुलाचे काम पुणे महापालिकेने काढलेले आहे. यापूर्वी पुणे पालिकेने हॅरिस पुलाचा निम्मा खर्च दिला होता. त्याच धर्तीवर सांगवीतील पुलासाठी पिंपरी पालिका निम्मा खर्च देत आहे. त्यासाठी स्थायी समितीची मान्यता घेतली आहे. पावसाळ्यात नदीला पाणी आल्यावर  8 मीटर रूंदीचा पूल बंद करावा लागतो. एकच लेन आहे. आता डबल लेन होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार असून प्रवाशांचा वेळ वाचणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.