Bhosari : पूर्ववैमनस्यातून दोघांवर वार; आरोपी अटक

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणाने दोघांवर कोयत्याने वार केले. ही घटना गुरुवारी (दि. 30) दुपारी साडेतीनच्या सुमारास कुलकर्णी चाळ, जयभिमनगर दापोडी येथे घडली.

अभिषेक राजू चव्हाण (वय 26, रा. चव्हाणचाळ, जयभिमनगर, दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आल्या उर्फ अॅलवीन रवी राजगोपाळ (वय 19, रा. जाधव चाळ, जयभिमनगर, दापोडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आल्या याची अभिषेक आणि त्याचा मावस भाऊ ऋतिक दिलीप संकपाळ (वय 17) यांच्यासोबत मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरुन भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरुन आल्या याने अभिषेक याच्या डोक्यात आणि डाव्या हातावर लोखंडी कोयत्याने वार केले. तसेच ऋतिक याच्याही डाव्या खांद्यावर वार केले. यामध्ये अभिषेक आणि ऋतिक दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.