Pune : गुंगीचे औषध मिसळलेली बिस्कीटे खाऊ घालून इसमाजवळील 95 हजारांचा ऐवज लंपास

स्वारगेट ते मुंबईच्या बसमधील प्रकार

एमपीसी न्यूज – स्वारगेट ते मुंबई असा बस प्रवास करीत असताना शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गुंगीचे औषध मिसळलेली बिस्कीटे खाऊ घालून प्रवाशा जवळील रोख रकमेसह सोन्याचे दागिने, असा एकूण 95 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.याप्रकरणी एका 56 वर्षीय पुरुषाने काळा चौकी मुंबई येथे फिर्याद दिली. हा गुन्हा मुंबईवरून स्वारगेट पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

स्वारगेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रविवारी (दि.19) स्वारगेट बस डेपो येथून सांगोला मुंबई सेंट्रल या बसमध्ये मुंबईला जाण्यासाठी बसले. यावेळी त्यांच्या शेजारी एक अनोळखी इसम येऊन बसला. त्याने फिर्यादी यांच्याशी ओळख वाढवून त्यांना गुंगीची औषधे मिसळलेली बिस्किटे खायला दिली. बिस्किट खाल्ल्यानंतर फिर्यादी यांना थोड्याच वेळात गुंगी आली.त्यानंतर इसमाने फिर्यादी यांच्या पॅन्टच्या खिशातील रोख 36 हजार रुपये व सोन्याचे दागिने, असा एकूण 95 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

फिर्यादी हे मुंबईला पोहोचल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी मुंबई येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मुंबई पोलिसांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग केला. त्यानुसार स्वारगेट पोलीस पुढील तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.