Corona second wave : राज्यात जानेवारी – फेब्रुवारीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – येत्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने वर्तवली आहे. त्यासंदर्भात प्रत्येक जिल्हा आणि महापालिका प्रशासनाला खबरदारी म्हणून संभाव्य लाटेची पूर्वतयारी करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. ‘सध्या राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असली तर युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आहे. युरोपियन देशांच्या उदाहरणावरुन भारतात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता आहे,’ असं आरोग्य सेवा संचालनालयाने म्हटलं आहे.

 

 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दहा लाख लोकसंख्येच्या मागे दररोज 140 तपासण्या करण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केल्या आहेत. डब्ल्यूएचओच्या या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश आरोग्य सेवा संचालनालयाने जारी केल्या आहेत. सुपरस्प्रेडर्स माध्यमातून कोविडचा प्रसार अधिक होतो. दुसरी लाट येण्यासाठी हे सुपरस्प्रेडर्स कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींचे सर्वेक्षण प्राधान्याने करण्याच्या सूचना आरोग्य संचालनालयाने दिल्या आहेत.

 

 

* औषधे व ऑक्सिजन पुरवठा 

 

महापालिका दवाखाने, खासगी छोटी रुग्णालये, छोटे क्लिनिक व रुग्णालयात ऑक्सिजन काॅन्सेट्रेटर यंत्रे उपलब्ध ठेवावी. पुढील पंधरा दिवसांचा औषधांचा साठा हा बफर स्टाॅक म्हणून तयार ठेवण्याच्या सूचना.

 

* फटाकेमुक्त दिवाळी 

 

फटाक्यांच्या धुरामुळे कोविड रुग्णांचा, श्वसनाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींचा त्रास आणखी वाढू शकतो. त्यामुळे यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्य संचालनालयाने केले आहे.

 

* फल्यू सदृश्य आजाराचे नियमित सर्वेक्षण

 

अधिक प्रमाणात फल्यू सारखे आजार असणारे रुग्ण आढळणाऱ्या भागात प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण आवश्यकतेनुसार वाढवावे. तसेच, गृहभेटी दारे सर्वेक्षण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अधिक वेगाने व युद्धपातळीवर करण्यात यावे असे या अहवालात म्हटले आहे.

 

* सतर्कतेचा इशा-यानुसार रुग्णालय व्यवस्था

 

लॅबमधील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण 7 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास रुग्णसंख्येनुसार जिल्हा आणि पालिका स्तरावर किमान पाच ते सात रुग्णालये समर्पित कोविड रुग्णालये म्हणून कार्यरत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड रुग्णांचे प्रमाण 7 ते 10 टक्के असल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रत्येक प्रभाग-तालुक्यात एक कोविड समर्पित रुग्णालय म्हणून करावे. रुग्णांचे प्रमाण 11 ते 15 टक्के असल्यास आणखी वीस टक्के कोविड रुग्णालये कार्यान्वित करावी. रुग्णांचे प्रमाण 16 ते 20 टक्के असल्यास सर्व मल्टिस्पेशालिटी रुग्णालये कोविडसाठी करावी. रुग्णांचे प्रमाण 20 टक्क्यांहून अधिक असल्यास सर्व रुग्णालये सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

* सुपरस्प्रेडर्स व्यक्तींचे विशेष सर्वेक्षण

 

किराणा दुकानदार, भाजीवाले, फुटपाथवरील विक्रेते, हाॅटेल मालक, वेटर्स, घरकाम करणाऱ्या महिला, गॅस सिलिंडर वाटप करणारे कर्मचारी, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, लाँड्री, इस्त्रीवाले, पुरोहित, ट्रक ड्रायव्हर्स, टेम्पोचालक, रिक्षाचालक, हमाल, रंगकाम व बांधकाम करणारे मजूर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील कंडक्टर व इतर कर्मचारी, हाउसिंग सोसायटीचे सुरक्षा रक्षक, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, पोलिस, होमगार्ड हे सुपरस्प्रेडर्स असू शकतात, असे आरोग्य संचालनालयाने म्हटले आहे. अशा सुपरस्प्रेडर्स व्यक्तींचे सर्वेक्षण आणि प्रयोगशाळा तपासणी प्राधान्याने करावी अशी सूचना या अहवालात करण्यात आली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.