Pune : आंतरराष्ट्रीय विश्वातील मराठी चित्रपटांचे स्थान विषयावर बुधवारी परिसंवाद

एमपीसी न्यूज – डिव्हाईन कॉज सोशल फाउंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय विश्वातील मराठी चित्रपटांचे स्थान या विषयावर येत्या बुधवारी (दि. २६) परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, ज्येष्ठ तंत्रज्ञ आणि ऑस्कर पुरस्कारांचे परीक्षक उज्ज्वल निरगुडकर, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ऑस्करपर्यंत पोहोचलेल्या ‘श्वास’चे दिग्दर्शक संदीप सावंत, दिग्दर्शक व राज्याचे सांस्कृतिक सल्लागार मिलिंद लेले, अभिनेता व दिग्दर्शक नागेश भोसले या परिसंवादामध्ये सहभागी होणार आहेत. चित्रपट लेखक राज काझी या परिसंवादाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

याप्रसंगी भाजपा कामगार आघाडीचे अध्यक्ष संजय केणेकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजीव पलांडे, इम्पाचे संचालक निर्माते विकास पाटील, निर्माते दिग्दर्शक अनिल काकडे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डिव्हाईन कॉज सोशल फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्रिती व्हिक्टर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी मेघराज राजेभोसले, सुनंदा काळुकर, राज काझी उपस्थित होते.

मेघराज राजेभोसले म्हणाले, “राष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपट गाजत आहेत त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरही मराठी चित्रपटांचा लौकिक वाढावा यासाठी मराठी चित्रपट महामंडळ प्रयत्न करणार आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपटांनी लौकिक प्राप्त केला आहे. मात्र ‘ऑस्कर’च्या स्पर्धेत अन्य भारतीय चित्रपटांसारखाच मराठी चित्रपट मागे पडतोय.

चित्रपटांच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायात मराठी चित्रपटांना बाजारपेठ कशी मिळवता येईल? माध्यम व्यवसायाचे बदलते स्वरूप व आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब याने मराठी चित्रपटांना जगभर पोहोचवता येऊ शकेल का? कलात्मक नावलौकिका बरोबरच मराठी चित्रपट व्यवसायाचा आर्थिकदृष्ट्या विकास कसा घडवता येईल? आदी विविध विषयांवर या परिसंवदामध्ये चर्चा करण्यात येणार आहे”. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विनामूल्य असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.